लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: ग्राहकांनी पुनर्भरण एटीएममध्ये भरणा केलेली रक्कम एटीएम सेवेतील कामगारांनी मोठ्या चलाखीने सेवाधारी कंपनीच्या अपरोक्षा काढून घेतली. एप्रिलमध्ये घडलेला हा प्रकार सेवाधारी एटीएम कंपनीच्या आता लक्षात आल्यानंतर दोन कामगारांच्या विरुध्द कंपनीने १३ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल केली.
एटीएम मधील रकमेचा अपहार करणाऱ्या कामगारांमध्ये सुरज अनंत चौगुले (२२, रा. रामचंद्र जोशी चाळ, नेमाडे गल्ली, डोंबिवली), राजेश किशोर दळवी (३४, ओम रेणुका काॅलनी, म्हसोबा मैदाना, चिकणघर, कल्याण) यांचा सहभाग आहे. बँकांना एटीएम सेवा देणारी कंपनी रायटर बिझनेस सर्व्हिसेसचे शाखेचे व्यवस्थापक देवेंद्र चुडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन कामगारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा… मेट्रो स्थानक बांधकाम क्षेत्र वगळून इतर मार्गरोधक हटवा, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
पोलिसांनी सांगितले, रायटर कंपनीत कामाला असलेले कामगार सुरज चौगुले, राजेश दळवी यांच्यावर बँकांच्या पुनर्भरण एटीएममध्ये ग्राहकांनी जमा केलेली रक्कम संकलित करुन ती रायटर कंपनी शाखेच्या मुख्य संकलन केंद्रात भरणा करण्याची जबाबदारी होती. एप्रिलमध्ये अशाप्रकारचे संकलन करत असताना आरोपींनी डोंबिवली ते अंबरनाथ दरम्यानच्या सहा ठिकाणच्या पुनर्भरण रक्कम एटीएममधून ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम जमा केली. ही सर्व रक्कम ताब्यात आल्यानंतर आरोपींनी या रकमेतील १३ लाख ६७ हजार ८०० रुपये रायटर कंपनी अधिकाऱ्यांच्या अपरोक्ष स्वताच्या फायद्यासाठी काढून घेतली. उर्वरित जमा रक्कम कंपनीच्या मुख्य संकलन केंद्रात जमा केली.
हेही वाचा… कोपर, ठाकुर्लीतील पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
एटीएममध्ये जमा झालेली रक्कम आणि मुख्य संकलन केंद्रात जमा झालेली रक्कम यांचा ताळमेळ जुळत नव्हता. यासाठी रायटर कंपनीने अंतर्गत चौकशी केली, त्यावेळी त्यांना सुरज, राजेश यांनी ही रक्कम चोरली असल्याचे निदर्शनास आले. मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.