कळवा येथील एका उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप रिदा रशिद या महिलेने केल्यावर आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशा गलिच्छ राजकारणामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी ठाणे आणि मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी आंदोलने केली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.




असं असतांना या प्रकरणाला समांतर आणखी एक घडामोड समोर आली आहे. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशिद या महिलेविरोधात शिवा जगताप याने ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल केला आहे. ‘२६ ऑक्टोबरला मित्रांसह मुंब्रा इथे मुंब्रेश्वर मंदीर इथे तलावाची पहाणी करण्यासाठी गेला असतांना मला रिदा रशिद यांनी जातीविचाक शिवीगाळ करत धक्काबुक्की करत हाकलून लावले. दिनांक १३ नोव्हेंबरला नवीन पुलाच्या कार्यक्रमासाठी गेलो असतांना तिथेही सव्रांसमोर मानसिक खच्चीकरण होईल असे अनुसूचित जातीव जमातीच्या बाबतीत अपशब्द काढले’ असं गुन्हा दाखल करतांना तक्रारीत जगताप यांने म्हटलं आहे.

दरम्यान रिदा रशिद या भाजपाच्या पदाधिकारी असल्याचं स्पष्ट झालं असून त्यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. नेमकी घटना काय घडली, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा का दाखल केला याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.