हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या उल्हासनगर पालिकेतील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांच्या अंत्ययात्रेत ४ ते ५ जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. तलवार आणि धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्यातील एकाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. तर आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी सांयकाळी उशिरापर्यंत हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांचे मंगळवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुपारी त्यांची अंत्ययात्रा कॅम्प पाच भागात कैलास कॉलनी स्म्शानभूमी येथे जाण्यासाठी निघाली. या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने पाटील यांना मानणारा वर्ग सहभागी झाला होता. या गर्दीचा फायदा घेत चार ते पाच आरोपी एका रिक्षामध्ये तलवार आणि धारदार हत्यारांसह अंत्ययात्रेत सहभागी झाले.
तलवार आणि धारदार शस्त्राने हल्ला
अंत्ययात्रा झाल्यावर प्रसाद पाटील आणि त्यांचे बंधू घरी जाण्यासाठी निघाले असता स्म्शानभूमीच्या बाहेरच या टोळक्याने पाटील बंधूवर तलवार आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही पाटील बंधू गंभीर जखमी झाले. या हल्ल्यामुळे स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी स्मशानाचे दार बंद करत हल्लेखोरांचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी या टोळक्यातील एकाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या हल्ल्यानंतर पाटील बंधूंना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढे दोन्ही बंधूंना पुढील उपचारासाठी कल्याणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली. यावेळी इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : चोर रूग्ण बनून दवाखान्यात आला, भाईंदरमध्ये महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून लूट
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा
या घटनेनंतर उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (२२ फेब्रुवारी) रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली. तर पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या वृत्ताला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिला नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करत उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याचेही राठोड यांनी सांगितले.