एकतर्फी प्रेमातून डोंबिवली पूर्वेत एका विवाहितेवर तिच्या जुन्या मित्राने चाकूने हल्ला करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. हल्लेखोर मित्राने मैत्रिणीकडे लग्नाची गळ घातली होती. त्यास तिने नकार देताच संतप्त मित्राने तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले.या विवाहितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विवाहितेचा डोंबिवलीतील दत्तनगर मध्ये राहणारा भाऊ राहुल बोडके याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी हल्लेखोर मित्र जिग्नेश्वर मोरेश्वर जाधव (रा. ब्राह्मण देव मंदिराजवळ, देसलेपाडा, डोंबिवली) याच्या विरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, राहलुची बहिण काजल हिचा वाशिंद येथील इस्माईल शेख याच्या बरोबर प्रेमविवाह झाला आहे. तिला दोन वर्षाची लहान मुलगी आहे. गुरुवारी काजल आईला भेटण्यासाठी डोंबिवलीत आली आहे. शुक्रवारी दुपारी ती काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरी येत असताना तिला शांतीनगर जैन मंदिरा जवळ आरोपी जिग्नेश जाधव आडवा आला. त्याने तिला ‘मी तुझ्या बरोबर लग्न करीन, तु माझ्या बरोबर ये,’ अशी गळ घातली. तिने नकार देताच संतप्त जिग्नेशने काजलच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करुन तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तेथून तो नंतर पळून गेला. तिला तात्काळ कळवा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.