वसई : वसईतील अनधिकृत बांधकामांवर आता अधोविश्वाची (अंडरवर्ल्ड) नजर पडली आहे. महामार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाकडून अंडरवर्ल्डच्या नावाने २ कोटींची खंडणी मागून त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना वसईत घडली आहे. दिवसाढवळ्या १० ते १२ हल्लेखोरांनी तलवारने बांधकाम व्यावासियाकाच्या कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालय आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात विकासक आणि त्याचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुचंद्र येथील जैन मंदिराजवळ विकासक जितेंद्र यादव यांचे विंध्यशक्ती इस्टेट ॲण्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. जमीन विकसित करून बांधकाम व्यावसासियाकांना विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी काही गुंडांनी संपर्क करून ‘अंडरवर्ल्ड’ सेठला २ कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. याला यादव यांनी नकार दिला होता. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास यादव आपल्या कार्यालयात बसले असताना १० ते १२ हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या. त्यांनी कार्यालयाची तसेच बाहेर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तोडफोड केली. हल्लेखोरांनी यादव आणि त्यांच्या दोन कर्मचार्‍यांवरही हल्ला केला. या हल्ल्यात ते तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर एका हल्लेखोराटी दुचाकी तिथेच सापडली आहे.

हेही वाचा >>> गुन्हा दाखल करण्यास विलंब, अभियंत्यांना मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद

या प्रकरणी नायगाव पोलिसांनी हल्लेखांविरोधात हत्येचा प्रयत्न, दंगल, हत्यारबंदी कायदा आदी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुख्य हल्लेखोर गिरीश नायर हा मोक्का गुन्ह्यातील कुख्यात आरोपी आहे. नेमकी कुणाच्या नावाने खंडणी मागितली आणि ते अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी सांगितले. मी या हल्लेखोरांना ओळखत नाही. त्यांनी माझ्याकडे येऊन सेठच्या नावाने २ कोटी रुपये मागितले. मी देण्यास नकार दिल्याने हा हल्ला केल्याचे बांधकाम व्यावसायिक जितेंद्र यादव यांनी सांगितले.

अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याचा संशय

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे येथील बांधकामांकडे आता अंडरवर्ल्डची नजर पडली आहे. कुख्यात गुंड सुभाषसिंग ठाकूर येथील बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ता वसूल करत असतो. या हल्ल्या मागे दाऊद किंवा छोटा शकील टोळीचा हात असल्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on builder office for extortion of 2 crores 3 injured ysh
Show comments