लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : मैत्रिणीच्या वादातून दिवा येथील एका तरुणाने कंपनीत काम करणाऱ्या एका व्यवस्थापकावर शुक्रवारी सकाळी पलावा चौक येथील निळजे उड्डाण पुलावर दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार घडला तेव्हा हल्लेखोराची यापूर्वीची महाविद्यालयीन मैत्रीण व्यवस्थापकाच्या दुचाकीवर होती. गेल्या चार वर्षापासून दिवा येथील तरूण यापूर्वीच्या आपल्या महाविद्यालयीन मैत्रिणीने बोलावे म्हणून तिचा पाठलाग करत आहे. तिला विविध प्रकारे त्रास देत असल्याच्या तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्यात आहेत.

आकाश कमलेश तिवारी (२१) असे जखमी झालेल्या कंपनी व्यवस्थापकाचे नाव आहे. आकाश डोंबिवली जवळील भोपर देसलेपाडा भागात राहतात. विशाल राजेंद्र तिवारी (२५) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. तो दिवा येथील बंदर भागात राहतो.

आणखी वाचा-ठाणे : अक्षय शिंदे याचा मृतदेह पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दफन

पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी सकाळी आकाश आणि त्यांची मैत्रीण दुचाकीवरून कंपनीत जाण्यासाठी शिळफाटा रस्त्याने डोंबिवली दिशेने येत होते. यावेळी पाळत ठेऊन असलेल्या आरोपी विशालने पलावा चौक येथे तक्रारदार आकाश तिवारी यांना त्यांची दुचाकी थांबविण्याचा इशारा केला. त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेल्या मैत्रिणीने तेथे न थांबण्याची खूण करून आकाश सुसाट वेगाने डोंबिवली दिशेने निघाला. पलावा चौकाजवळील निळजे उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने आकाश मैत्रिणीसह त्या कोंडीत अडकला. हा गैरफायदा घेत आरोपी विशाल आकाशचा पाठलाग करत पुलापर्यंत पोहचला. त्याच्या हातात दगडी होत्या. आकाश कोंडीत अडकल्याने विशालने आकाशच्या डोक्यात हातमधील दगडी मारून त्याला गंभीर जखमी केले. आकाश रस्त्यात रक्तबंबाळ झाला. या घटनेनंतर आकाश मैत्रिणीच्या सोबतीने पलावा येथील एका खासगी रुग्णालयात गेला. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. विशालने दगडीने हल्ला करून आपणास गंभीर जखमी केल्याची तक्रार आकाश तिवारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

आणखी वाचा-भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रंदवे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

पोलिसांनी सांगितले, विशाल तिवारी आणि त्याची महाविद्यालयीन मैत्रिण यांच्यात वाद आहे. तीन वर्षापूर्वी विशाल आणि त्याची मैत्रिण एकत्र होते. पण विशाल बरोबर न पटल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्याचा राग विशालला आहे. दरम्यानच्या काळात विशालने मैत्रिणीचा वेळोवेळी रस्त्यात पाठलाग करून तिने आपल्याशी बोलावे म्हणून प्रयत्न केले आहेत. मैत्रिण बोलत नाही म्हणून या रागातून मैत्रिणीचा मोबाईल हिसकावून तो रस्त्यावर आपटून विशालने फोडला आहे. विशालने मैत्रिणीच्या घरी जबरदस्तीने जाऊन तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार मैत्रिणीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी विशालला घराबाहेर काढले होते. आपली मैत्रीण आकाशच्या दुचाकीवरून फिरते याचा राग विशालला आहे. या रागातून विशालने आकाशवर हल्ला केला आहे. विशाल वारंवार त्याच्या मैत्रिणीला त्रास देत आहे. त्यामुळे त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मैत्रिणीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.