डोंबिवलीतील भाजपाचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर सोमवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रामनगरमधील दुकानात २ हल्लेखोरांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मनोज कटके हे भाजपाचे समाज माध्यम विभागाचं डोंबिवलीचे काम बघतात. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये शाब्दिक वाद, फलक युद्ध सुरू आहे. सेना भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना समाज माध्यमातून उलट सुलट उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कटके हे गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या वतीने शिवसेना नेत्यांची व्यंगचित्रे समाज माध्यमांवर टाकत होते. त्यात तितक्याच जोरकसपणे शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिले जात होते.
कळण्याच्या आत हल्लेखोरांनी डोळ्यात फेकली मिरची पूड
मनोज कटके सोमवारी सकाळी १० वाजता डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील आपल्या पेट शॉपमध्ये बसले होते. अचानक दोन तरुण त्यांच्या दुकानात घुसले. कटके यांना कळण्याच्या आत हल्लेखोरांनी मनोज यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यांना खुर्चीवरून खाली पाडून दोन बांबूच्या साह्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मनोज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शरीराच्या इतर भागांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.
हल्ल्यात मनोज कटके गंभीर जखमी
हल्ल्यानंतर मनोज यांनी दूकानात आक्रोश सुरु केला. डोळ्यात मिरचीची पूड असल्याने त्यांना काही कळत नव्हते. कोण आहे कोण आहे असे ते ओरडत होते. मनोज यांची दुकानातील आरडाओरड ऐकून पादचारी, बाजूचे दुकानदार दुकानात आले. त्यांनी तातडीने रामनगर पोलिसांना माहिती दिली. मनोज यांना अधिक उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मनोज कटके यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तातडीने डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
“राजकीय द्वेषातून हल्ला”, आमदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप
आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, “राजकीय द्वेषातून हा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेतील. त्यातून पुढे येणाऱ्या नावांमधून आरोपी कोण आहेत ते कळेल.”
हेही वाचा : डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार
“भाजपचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध तातडीने सुरू करण्यात आला आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.