तालुक्यातील गारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गारगाव पूल कृती समितीचे अध्यक्ष संदीप ठाकरे हे शनिवारी दुपारी झालेल्या मारहाणीत जबर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारगाई नदीवरील पूल तुटून दोन वर्षे झाली. तरी अद्याप पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही. त्याच्या निषेधार्थ संदीप ठाकरे येत्या सोमवारपासून (२५ मे) उपोषण आंदोलन करणार होते. लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच पुलाचे काम रखडले, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकावरून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य भालचंद्र खोडका यांनी ठाकरे यांना शुक्रवारी ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात ठाकरे यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रारही केली; मात्र तक्रार करून २४ तास होत नाहीत, तोच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी भालचंद्र खोडकासह अन्य आरोपी फरार आहेत.
त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, खोडका यांच्या या कृत्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा