ठाणे : रस्त्यामध्ये अडथळा ठरणारे वाहन बाजूला करण्यास सांगितल्याने दोन तरुणांनी एकावर पिस्तुल रोखत तलवारीने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सचिन यादव आणि अजय देवरस या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनाही अटक झाली असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

वागळे इस्टेट परिसरातून २८ वर्षीय व्यक्ती त्याच्या मित्रासोबत रविवारी सायंकाळी रिक्षाने जात होता. त्यावेळी रस्त्यावर एक मोटार वाहतुक अडथळा ठरेल अशा प्रकारे उभी होती. मोटारीजवळ सचिन हा एका व्यक्तीसोबत गप्पा मारत उभे होते. त्यामुळे तरुणाने त्यांना मोटार बाजूला उभी करण्यास सांगितली. या प्रकाराचा सचिन याला तरुणाचा राग आला. त्याने तरुणास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काहीवेळाने पुन्हा सचिन त्याठिकाणी आला. त्याच्या हातात पिस्तुल होती. ही पिस्तुल दाखवित त्याने तरुणाला घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने ते पिस्तुल पँटमध्ये खोचले. पुन्हा त्याने तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तो पँटमध्ये खोचलेले पिस्तुल बाहेर काढत असताना, त्या तरुणाने त्याला पकडले. त्यावेळी सचिन याचा साथिदार अजय देवरस तेथे आला. त्याने तरुणाच्या पाठीवर तलवारीने वार केला. या घटनेत तरुण जखमी झाला. त्यानंतर अजय आणि सचिन दोघेही तेथून निघून गेले.

तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तरुणाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सचिन आणि अजय या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे दोघांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. सचिन यादव याच्याविरोधात २०१६ मध्ये चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तर शस्त्रास्त्राने हल्ला केल्याप्रकरणी अजय देवरस याच्याविरोधात २०२० मध्ये गुन्हा दाखल होता अशी माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.