ठाणे : वर्तकनगर येथील महात्मा फुलेनगर भागात भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. घटना घडली त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते, असे बिस्वाल यांनी सांगितले. घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – कल्याण: धोकादायक शांती उपवनमधील रहिवाशांचे सामान बाहेर काढण्यात यश
हेही वाचा – ठाण्यात गारांचा पाऊस
महात्मा फुलेनगर भागात धनंजय बिस्वाल हे वास्तव्यास असून ते ठाणे शहरात भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. या परिसरात त्यांचे एकमजली घर असून सुमारे महिन्याभरापूर्वी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर भाजपाचे कार्यालय सुरू केले आहे. मंगळवारी धुलिवंदनानिमित्ताने ते घरात असताना पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा त्यांना आवाज झाला. त्यामुळे ते कार्यालयात शिरले असता, एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयामध्ये राॅकेल ओतत होता. बिस्वाल यांना पाहताच त्याने बाहेर पळ काढला. त्यानंतर तो व्यक्ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या त्याच्या एका साथिदारासोबत पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बिस्वाल यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.