लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली जवळील शिरढोण गावात रविवारी सकाळी एका शेतकऱ्याला गावातील चार जणांनी लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली तर कुटुंबातील सगळ्यांना मारू टाकू, अशी धमकी दिली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

विष्णु हरि पाटील (४६) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते शिरढोण गावात कुटुंबासह राहतात. रविवारी सकाळी आठच्या दरम्यान ते घरात झोपले होते. या कालावधीत त्यांच्या घरात लाकडी दांडके घेऊन विलास भगवान पाटील, सुनील भगवान पाटील, मयूर गुरुनाथ पाटील, सोनल विलास पाटील हे शिवीगाळ करत घरात घुसले. त्यांनी लांडकी दांडक्यांनी झोपेत असलेल्या विष्णु यांना बेदम मारहाण केली. पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली तर तुझ्यासह कुटुंबीयांना मारून टाकू अशी धमकी दिली. या घटनेनंतर विष्णु पाटील यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी आरोपी पाटील कुटुंबीयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader