सार्वजनिक गणेशोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून भिवंडीत केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या (आयबी) अधिकाऱ्याला पाच जणांनी कार्यालयात शिरून मारहाण करत गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
विश्वनाथ पाटील (३६), प्रतीक बोरसे (२६), सुनील राहुलवार (३३), जतीशर मेशफुलारे (२७), सागर पाटील (२५) अशी अटकेत असलेल्यांचा नावे आहेत. या मारहाणीत अधिकाऱ्याचा गळा आवळल्याने ते बेशुद्ध झाले होते. त्यामुळे आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – ठाण्यातील आरे वाचवा आंदोलनात ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ
भिवंडी येथील टेमघर भागात साईश्रद्धा मित्र मंडळ नावाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. मंडळाचे कार्यकर्ते शनिवारी थेट भिवंडीतील केंद्रीय गुप्तवार्ता कार्यालयात शिरले. त्यांनी तेथील अधिकाऱ्याकडून वर्गणी मागितली. त्यास अधिकाऱ्याने विरोध केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेची माहिती अधिकाऱ्याने तात्काळ त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास फोनवरून दिली. त्यानंतर कार्यकर्ताने हाताने गळा आवळला. त्यामुळे अधिकारी बेशुद्ध झाला. या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेऊन अटक केली.