डोंबिवली: ‘हाॅटेल आणि बार बंद केले असल्याने आता मी तुम्हाला बिअर देऊ शकत नाही,’ असे उत्तर शुक्रवारी रात्री एका ५६ वर्षाच्या हाॅटेल मालकाने एक ग्राहक आणि त्याच्या तीन साथीदाराला देताच, चौघांनी मिळून हाॅटेल मालकाला बेदम मारहाण करत, त्यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
डोंबिवली पूर्व भागातील टिळक चौकातील यशवंत स्मृति इमारती जवळील सत्यम ड्रायफ्रुट दुकानासमोर रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली. हाॅटेल मालक सुधाकर मधुकर शेट्टी (रा. जुनी डोंबिवली) चाकू हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. सिध्दार्थ बालाजी भालेराव आणि त्याच्या तीन साथीदारांनी हा हल्ला केला आहे. त्यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात शेट्टी यांनी तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, हाॅटेल मालक शेट्टी शुक्रवारी रात्री हाॅटेल आणि बार बंद करुन घरी चालले होते. त्यावेळी तेथे आरोपी सिध्दार्थ भालेराव आणि त्याचे तीन साथीदार आले. सिध्दार्थने शेट्टी यांच्याकडे बिअर बाटल्यांची मागणी केली. आता बार बंद झाला आहे. मी तुम्हाला बिअर देऊ शकत नाही, असे बोलून शेट्टी घरी जाण्यास निघाले. आरोपी सिध्दार्थने पाठीमागून जाऊन शेट्टी यांची मान आवळून त्यांना बुकलून मारहाण करण्यास सुरुवात केली. बिअर कसा देत नाहीस, ते पाहतो, असे बोलून हातामधील धातुच्या कड्याचे वार शेट्टी यांच्या डोक्यावर केले.
हेही वाचा >>> ठाणे : शिळफाटा येथे टोरंट कंपनीच्या रोहित्राचा स्फोट; एकाचा मृत्यू
यावेळी सिध्दार्थचे इतर तीन साथीदारही शेट्टी यांना मारहाण करु लागले. शेट्टी यांना ठार मारण्याच्या उद्देशातून आरोपी त्यांना मारहाण करत होते. या झटापटीत सिध्दार्थने जबरदस्तीने बिअर बार उघडण्याचा प्रयत्न केला. शेट्टी यांनी त्यास विरोध केला. सिध्दार्थने जवळील चाकू बाहेर काढून ‘तुला आता ठार मारतो’ असे बोलून शेट्टी यांच्या डोक्यावर धारदार चाकूने वार केले. शेट्टी यांना गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी पळून गेले. हाॅटेल मालक संघटनेने या हल्ल्याचा निषेध करुन आरोपींना अटक करण्याची मागणी केली.