लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : घरातील सावत्र मुलीला मी सांभाळणार नाही, या कारणावरून झालेल्या भांडणातून रविवारी दुपारी कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी भागात एका पतीने आपल्या पत्नीला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या महिलेची बहीण आणि शेजाऱ्यांनी धावपळ करून या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर या महिलेचा पती घरातून पळून गेला.

या महिलेच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपले दुसरे लग्न आपणास मारहाण करणाऱ्या पतीबरोबर झाले आहे. आम्हाला दोन मुले आहेत. पहिल्या पतीपासून आपणास एक मुलगी आहे. सावत्र मुलीला घेऊन पती ऑगस्टमध्ये त्यांच्या उत्तरप्रदेशातील गावी गेले होते. तेथे पतीच्या कुटुंबीयांनी सावत्र मुलीला विविध प्रकारचा त्रास देऊन तिला चटके दिले होते. त्याच्या खुणा तिच्या शरीरावर दिसत होत्या. सावत्र मुलीला झालेल्या त्रासाबद्दल आपण आपल्या पतीला जाब विचारला. त्यावेळी संतप्त झालेल्या पतीने पत्नीला माझी दोन मुले मला देऊन टाक. मी तुझ्या पहिल्या पतीपासूनच्या मुलीला सांभाळणार नाही, असे सांगितले.

आणखी वाचा-टिटवाळा येथे महावितरणकडून २४ लाखाची वीज चोरी उघड

महिलेला लहान बाळ असल्याने तिने पतीला मुल देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. रागाच्या भरात घरातील फिनेलची बाटली जबरदस्तीने महिलेच्या तोंडात ओतून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिनेलचा काही अंश तोंडात गेल्याने महिलेला उलटी झाली. यावेळी घरात ओरडा झाल्याने शेजारी धाऊन आले. पीडित महिलेने हा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. बहिण व शेजाऱ्यांनी तातडीने महिलेला टिळकनगर पोलीस ठाणे आणि तेथून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या घटनेनंतर महिलेचा पती घरातून पळून गेला. पोलिसांनी पती विरुध्द महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to kill wife by pouring fennel to her in dombivli mrj