पश्चिम डोंबिवलीत बुधवारी एकाच रात्री सराफांची दोन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मानपाडा रस्त्यावरील एका जवाहिरीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चोरट्यांनी शेजारच्या दुकानातून या सराफाच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे काहीच न सापडल्याने चोरांना रिकाम्या हाताने परतावे लागले. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे टिळकनगर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
पश्चिम डोंबिवलीत वैष्णव श्री बालाजी ज्वेलर्स, रायकर ज्वेलर्स ही दुकाने फोडून चोरट्यांनी १३ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना ताजी असतानाच पूर्वेकडील श्रीखंडेवाडीत असलेले राजलक्ष्मी आर्ट ज्वेलर्स दुकान फोडल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. टाटा लाइनखाली प्रणव ओंमकार सोसायटीत राहणारे शांतीलाल कुंदन सोनी यांच्या मालकीचे श्रीखंडेवाडीमध्ये असलेल्या सीटी आर्ट सोसायटीच्या तळमजल्यावर राजलक्ष्मी आर्ट ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून मालक आणि नोकर घरी निघून गेले. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले.
हेही वाचा – राज ठाकरे उद्या ठाण्यात; मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरातील दुसरा दौरा
चोरट्यांनी या दुकानास लागून असलेल्या बंद दुकानामागील काच व लोखंडी ग्रिल तोडली. त्यातून सदर दुकानात घुसून भिंतीला राखून छिद्र पाडले. त्यांनी दुकानात प्रवेश केला. तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी दुकानाचे मालक शांतीलाल सोनी याच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.