बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन डोंबिवलीत ज्या ६५ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्या जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. त्यात ज्या इमारती रिकाम्या आणि निर्माणाधीन आहेत, अशा इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. या निर्माणाधीन, रिकाम्या इमारतींवर कारवाई होऊ नये म्हणून बांधकामधारकांनी नाका कामगार, झोपडपट्टी, बेघर, गरजू लोकांना काही दिवस आपल्या इमारतींमध्ये निवास करावा म्हणून गळ घालण्यास सुरुवात केली आहे.
बांंधकामधारकांच्या बेकायदा इमारतीत निवास करणाऱ्या नाका कामगार, बिगारी, बेघर, गरजू यांना कुटुंबासह निवास करावा. तुमचे घरातील काही सामान बेकायदा इमारतीत आणून ठेवावे. गृहपयोगी आवश्यक भांडी आम्ही खरेदी करुन देऊ, असे बांधकामधारकांकडून निवास करणाऱ्या रहिवाशांना सांगितले जात आहे. भूमाफिया सकाळीच डोंबिवली पूर्वेतील नेहरु रस्त्यावरील कामगार नाक्यावर येऊन काही कामगारांना ‘तुम्ही काही दिवस कोठे कामाला जाऊ नका. त्या मजुरीचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. तुमची भोजनाची व्यवस्था आम्ही करू. फक्त तुम्ही काही दिवस आमच्या बेकायदा इमारतीत कुटुंबासह काही दिवस येऊ रहा’ अशी गळ घालत असल्याचे सुत्रांकडून समजते.
बेकायदा इमारत प्रकरणात ईडीने आक्रमक पध्दतीने चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण विशेष तपास पथकाच्या पुढे गेल्याची चाहूल लागल्याने भूमाफिया कमालीचे अस्वस्थ आहेत. एकीकडे अटकेचा ससेमिरा, दुसरीकडे बांधकामे वाचविण्यासाठी धडपड अशा दुहेरी कात्रीत माफिया सापडले आहेत.
डोंबिवली पश्चिमेत उमेशनगर मध्ये एक १२ माळ्याची बेकायदा इमारत पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यात बांधली आहे. या इमारतीसाठी बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे रेरा प्रमाणपत्र मिळविण्यात आले आहे. तसेच, गरीबाचावाडा येथे अग्निशमन केंद्रासमोरील ६५ इमारतींमधील भरत गायकवाड या माफियाची इमारत अर्धवट तोडून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी केला आहे. या दोन्ही इमारती बनावट बांधकाम परवानग्या प्रकरणातील आहेत. ही माहिती आपण तपास पथक आणि ईडीला देणार आहोत, असे तक्रारदार संदीप पाटील यांनी सांगितले. बहुतांशी नाका कामगारांना, बेघर, गरजूंना ज्या इमारतीत राहण्यास सांगितले जात आहे, ती प्रकरणे पोलीसांच्या चौकशी फेऱ्यातील असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
“ डोंबिवलीतील पोलीस चौकशी फेऱ्यातील ६५ तयार बेकायदा इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरुपात रहिवास दाखविण्याासाठी गरजूंना या इमारतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. गॅलरीमध्ये कपडे वाळत घातले म्हणून कारवाई होणार नाही या भ्रमात भूमाफियांनी राहू नये. ” – संदीप पाटील , वास्तुविशारद, तक्रारदार , डोंबिवली.
हेही वाचा: ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल
“ बेकायदा इमारती वाचविण्यासाठी माफिया गरजू, कामगारांच्या कुटुंबीयांना निवासासाठी गळ घालत आहेत. यासाठी ते रोजंदारी देण्यास तयार आहेत. कोणीही गरजूने अशा इमारतीत राहण्यास जाऊ नये. माफियांचेच पाप त्यांनाच फेडू दे.” -सौरभ ताम्हणकर, कायदे सल्लागार