लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – येथील पूर्व भागातील जरीमरी भागात रहिवाशांच्या वर्दळीच्या रस्ता सुस्थितीत करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ गुरूवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी काही मंडळींनी या रस्ते कामाला जोरदार विरोध केला. आमदार गायकवाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला, पुरूषांच्यामध्ये जोरदार झटापटी झाली.
यासंदर्भातचे दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. या रस्त्या संदर्भात आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले, जरीमरी नगरच्या ज्या भागात रस्ता बांधण्यात येणार आहे.ती जागा सार्वजनिक आहे. ती जागा कोणच्याही व्यक्तिगत मालकीची नाही. अनेक वर्ष रहिवासी या रस्त्यांवरून येजा करतात. त्यामुळे हा रस्ता कोणालाही ताब्यात घेण्याचा, तो बंद करण्याचा अधिकार नाही. या रस्त्यालगत उद्यानाची आरक्षित जागा आहे. या भागातील एका शाळेला आपण २० फूट जागा सोडून मगच बांधकाम करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रस्ता रेषा निश्चित असल्याने आपण शासकीय निधीतून जरीमरी नगर भागातील लोकांच्या सोयीसाठी रस्ता तयार करत आहोत. परंतु, एका शाळेला या भागातील जमीन हडप करायची असल्याने हा सगळा प्रकार करण्यात आला आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील तोडलेली बेकायदा इमारत पुन्हा जोडण्यास प्रारंभ
स्थानिक रहिवाशांनी आमच्या हक्कासाठी आमदार गायकवाड यापूर्वीपासून या भागात जमिनीसाठी झगडत आहे. त्यांच्या प्रयत्नाने या भागात रस्ता होत असल्याने या कामाला विरोध करणाऱ्यांना आम्ही येथे उभे राहू दिले नाही. येथे कोणत्याही प्रकारचा राडा झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी महिला, पुरूष एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसत होते. यासंदर्भात पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकाराची नोंद झालेली नाही.