ठाणे : काही महिन्यांपुर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलेले कळवा परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. हल्लेखोरांनी शिवसेनेचे फलकही फाडले असून याप्रकरणी कळवा पोलिसांनी तन्मय गाडे, कृष्णा कनोजिया यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यामागे राजकीय संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळवा येथील विटावा भागातून जितेंद्र पाटील हे निवडुण येतात. ते राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जायचे. त्यांनी काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शुक्रवारी पहाटे ५ वाजता ते घरी होते. त्यावेळेस परिसरात राहणारे तन्मय आणि कृष्णा यांच्यासह पाच जण दुचाकीने त्यांच्या निवासस्थानाजवळ आले. त्यानंतर त्यांनी पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पाटील हे घराबाहेर आले असता, तन्मय आणि कृष्णा आणि त्यांच्या साथिदारांनी पाटील यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यावेळी त्यांच्या घराच्या काचा फुटल्या. या दरम्यान तन्मय याने पाटील यांना ठार मारण्याची धमकीही दिली. तसेच त्यांनी शिवसेना पक्षाचा फलकही फाडला. सोमवारी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय आणि त्याच्या साथिदारांनी यापूर्वीही जितेंद्र पाटील यांच्या भावावर हल्ला केला होता.