लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर मध्ये बुधवारी रात्री एका रिक्षा चालकाने रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी शेखर जोशी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून संतप्त रिक्षा चालकाने हा प्रकार केला आहे. या हल्ल्याचा प्रयत्न करत असताना रिक्षा चालकाने रिक्षेतील चाकू बाहेर काढून रिक्षा संघटना पदाधिकारी जोशी यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जोशी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. एमएच-०५-डीझेड-९३३३ असा रिक्षेचा वाहन क्रमांक आहे.
रिक्षा संघटना पदाधिकारी शेखर जोशी बुधवारी रात्री उमेशनगर मधील तोंडवळकर विद्यालया समोरील चहाच्या टपरीवर चहा पित उभे होते. त्यांची दुचाकी टपरीच्या समोर उभी होती. चहा पिऊन झाल्यानंतर तक्रारदार जोशी जाण्यास निघाले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या समोर एक रिक्षा उभी होती. जोशी यांनी संबंधित रिक्षा चालकाला दुचाकी काढेपर्यंत रिक्षा थोडी बाजुला घे, अशी विनंती केली. त्या मागणीकडे दुर्लक्ष करत रिक्षा चालक तेथून निघून गेला. दुचाकी काढायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्याने जोशी यांनी त्यांना पुन्हा रिक्षा काढण्याची विनंती केली. त्यावेळी रिक्षा चालकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जोशी यांना रस्ता तुमच्या बापाचा आहे का. रिक्षा जागेवरून काढणार नाही, असे बोलून जोशी यांच्याशी वाद घातला. शाब्दिक चकमकीनंतर रिक्षा चालकाने रिक्षेत जाऊन पाठीमागे लपून ठेवलेला धारदार चाकू कमरेला लावला आणि दुसऱ्या हातात वजनदार दगड घेऊन तो जोशी यांच्या डोक्यात टाकण्याचा, तसेच चाकूची धमकी देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. टपरी जवळील काही नागरिक मध्ये पडल्याने मोठा अनर्थ टळला.
आणखी वाचा-ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नागपूरात बदल्या
ही माहिती जोशी यांनी तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांना दिली. त्यांनी तातडीने शोध पथकाचे पोलीस घटनास्थळी पाठविले, तोपर्यंत हल्लेखोर रिक्षा चालक पळून गेला होता. पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेतला तो आढळून आला नाही. रिक्षा चालक अशोक बाळाराम म्हात्रे चाळ, खोली क्रमांक चार, मोठागाव, डोंबिवली पश्चिम येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या रिक्षेत रिक्षा चालकाने चाकू कशासाठी ठेवला होता, असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
तक्रार प्राप्त होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्याने कायद्याने आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगितले. रिक्षा चालकाचा तपास घेतला जात आहे, अशी माहिती विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.