ठाणे : भिवंडी येथील खोणीगाव भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एका व्यक्तीने तलवारी भिरकावत दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात देवीदास पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खोणीगावातील सिद्धार्थ नगर परिसरात रविवारी रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १०० हून अधिकजण सहभागी झाले होते. त्याचवेळी या भागात राहणारा देवीदास पाटील हा दुचाकीवरुन त्याठिकाणी आला. त्याने जमलेल्या नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो घरी गेला. घरी जाऊन त्याने दोन्ही हातात तलवारी आणल्या. त्यानंतर पुन्हा तो त्याठिकाणी आला. त्याने तलवारी भिरकावण्यास सुरुवात केली. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दोन तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर सर्व जमलेले लोक सैरावैरा पळू लागले. नागरिकांनी घरामध्ये जाऊन स्वत:ला बंद करुन घेतले. दरम्यान, एक व्यक्ती तिथे आला. त्याने देवीदास याला तेथून दूर नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर कार्यक्रमात सहभागी नागरिक निजामपूरा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहितेचे कलम १०९, ३५२, ३५१ (२), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे.