लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : येथील पूर्वेतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगावर भरधाव वेगातील थार वाहन घालून त्या विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा, तसेच अपहरण करण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या आई, वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.

विद्यार्थ्याच्या अंगावर थार वाहन घालण्याचा प्रकार लोकग्राम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेसंदर्भातची आणि पीडित विद्यार्थ्याची आई जुही सावंत यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी, की पीडित विद्यार्थी श्लोक सावंत आपल्या कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागात राहतो. तो बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर श्लोक सावंत आपल्या मित्रांसह दुचाकीवरून घरी निघाला होता. यावेळी सुयश तिवारी नावाचा तरूण थार वाहनाने श्लोक सावंत याचा पाठलाग करत होता.

ही बाब प्रवासात असताना श्लोकच्या लक्षात आली नाही. परंतु, लोकग्राम येथील घराजवळ श्लोक मित्राच्या दुचाकीवरुन उतरला. त्यानंतर तो घरी पायी जात असताना अचानक पाठलाग करत असलेला सुयश तिवारी तेथे पोहचला. त्याने ताब्यातील थार वाहन श्लोकच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या धडकेत श्लोक थोडक्यात बचावला. या घटनेनंतर सुयशचे दोन साथीदार वाहनातून खाली उतरले. त्यांनी श्लोकला मारहाण करून त्याला जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करू लागले. श्लोकने त्यांना प्रतिकार केला. आपले अपहरण होत असल्याचे लक्षात येताच श्लोक सावंतने आरडाओरडा केला. आता लोक जमा होतील या भीतीने सुयश तिवारी आणि त्यांचे साथीदार तिथून निघून गेले.

ही माहिती श्लोकच्या आई, वडिलांना समजताच त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घडल्या घटनेची तक्रार केली. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या सगळ्या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांनी फक्त परप्रांतीयांच्या हातचा मार खात राहायचे का. महाराष्ट्रात मराठी माणुस सुरक्षित नाही हेच या सगळ्या प्रकारावरून दिसते, अशी कठोर शब्दातील प्रतिक्रिया श्लोकची आई जुही सावंत यांनी दिली आहे.

Story img Loader