राबोडी येथील एका घरफोडीच्या प्रकरणाचा तपास करत असताना ठाणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन बंदूका आणि जीवंत काडतूसे जप्त केली होती. या जिवंत काडतूसांच्या पुंगळीवरून पोलिसांना आणखी एका प्रकरणाचा छडा लावला. सुमारे वर्षभरापूर्वी या हल्लेखोरांनी एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पंरतु जप्त काडतूस आणि वर्षभरापूर्वी मिळालेली काडतूसाची पुंगळी ही समान असल्याने दुसराही गुन्हा उघडकीस आला, असे उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.
हेही वाचा- योग्य-अयोग्यतेचा विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा; डॉ. अनिल काकोडकर
रफीक शेख (४०), रमेश कुंवर राम (३३) आणि अंजुम शेख (४०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. राबोडी येथे काही दिवसांपूर्वी घरफोडीचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील आरोपी हे राबोडी, कॅसलमील भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस हवालदार दयानंद नाईक यांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून रफीक, रमेश आणि अंजुम या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी रफीक आणि रमेश या दोघांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडून दोन बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी काडतूसांचे निरीक्षण केले असता, अशाचप्रकारच्या एका काडतूसाची पुंगळी कोलबाड येथील एका व्यापाऱ्याच्या मुलावरील झालेल्या गोळीबारात आढळून आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घाटेकर यांनी तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा गोळीबार केल्याची कबूली दिली.
हेही वाचा- ठाणे : पंजाबमधील सोनू खत्री टोळीचे गुन्हेगारांना आंबिवलीतून अटक
गोळीबाराचे नेमके प्रकरण काय होते ?
ठाण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या कोलबाड येथे चेतन ठक्कर यांच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. ५ फेब्रुवारी २०२२ ला चेतन हे दुकानातील रोकड घेऊन घरी येत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी चेतन यांच्या पोटात लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने ते गृहसंकुलाच्या आवारात असल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले होते. याप्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले होते. परंतु चित्रीकरण अस्पष्ट दिसत होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात होते.
गुन्ह्याची कबूली
चेतन हा रोकड घेऊन निघाल्याची माहिती अंजुमला मिळाली होती. त्याने ही माहिती रफीक आणि रमेश यांना दिल्यानंतर दोघेही दुचाकीवरुन त्याठिकाणी आले होते. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. त्यांनी बंदूका कुठून घेतल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.