किरकोळ वादातून चाकूने वार करून दोघांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी निलेश तिवारी (२५) आणि दिलेश तिवारी (२७) या हल्लेखोरांना अटक केली आहे. तर एकाचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा >>>ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ काही तासांसाठी बंद
चंद्रभुसड तिवारी (५०) आणि त्यांचा मुलगा आशिष तिवारी (३०) अशी जखमींची नावे आहेत. कळवा येथील विश्वकर्मा चाळ परिसरात चंद्रभुसड तिवारी यांची बहिण तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तर याच चाळीत निलेश हा देखील राहतो. या दोन्ही कुटुंबियांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असत. बुधवारी या दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला असता, चंद्रभुसड आणि आशिष हे दोघेही त्याठिकाणी आले. त्याचवेळी निलेश, दिलेश आणि अशोक तिवारी या तिघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या पोटात चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनप्रकरणी चंद्रभुसड यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी निलेश आणि दिलेश यांना अटक केली असून अशोक याचा पोलीस शोध घेत आहेत.