कल्याण : मध्य रेल्वेच्या आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी मध्यरात्री अज्ञात इसमाने एक फूट लांंबीची लोखंडी पट्टी रेल्वे रूळावर ठेऊन घातपात करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरहेड वायरचे इंजिन या रेल्वे रूळावरून जात असताना इंजिनच्या दर्शनी भागाला या लोखंडी पट्टीचा फटका बसला. इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती अज्ञाताकडून करण्यात आल्याने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसारा येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार नीलेश मोरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान किलोमीटर नंबर ९५-३८ या ठिकाणी ही लोखंडी पट्टी रेल्वे रूळावर ठेवण्यात आली होती.
हे ही वाचा… सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार नीलेश मोरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी मध्यरात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरचे इंजिनचे लोको पायलट अजय कुमार हे त्यांच्या ताब्यातील ओव्हरहेड वायर इंजिन घेऊन कसारा येथे चालले होते. त्यांचे इंंजिन आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत असताना किलोमीटर नंबर ९५-३८ येथे रेल्वे रूळावर अज्ञात इसमाने एक फूट लांबीची लोखंडी पट्टी ठेवली होती. या लोखंडी पट्टीचा वेगात असलेल्या इंजिनच्या दर्शनी भागाला जोराने फटका बसला. रूळ आणि चाकाखाली काही बोजड आल्याचे लक्षात येताच, इंजिन खडबडल्याने पुढे जाऊन लोकोपायलटने इंजिन जाऊन थांबविले. त्यांनी इंजिनमधून उतरून इंजिन खडबडले त्या रूळाच्या भागाची पाहणी केली. त्यांना एक लोखंडी पट्टी त्या ठिकाणी रुळावर ठेवली असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती तातडीने कल्याण लोहमार्ग पोलीस, कसारा रेल्वे स्थानक मास्तरांना दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले.
हे ही वाचा… डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती अज्ञाताने केल्याने पोलिसांनी रेल्वे कायद्याने अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य कोणी केले आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सुदैवाने या रेल्वे मार्गावरून इंजिन जात होते म्हणून हा प्रकार निदर्शनास आला. एक्सप्रेस, मेल या मार्गावरून वेगाने धावत असती तर मोठा अनर्थ याठिकाणी घडला असता, असे रेल्वेतील सुत्राने सांगितले.