कल्याण : कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर याच भागातील एका सराईत गुन्हेगार तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी घडला. कोळसेवाडी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी पीडित आणि तिच्या कुटुंबीयांना रात्री उशिरापर्यंत चौकशीसाठी ठाण्यात बसवून ठेवल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणारा विशाल गवळी हा ३५ वर्षांचा आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, असे कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले. पीडित अल्पवयीन मुलगी बुधवारी संध्याकाळी शिकवणी वर्गातून घरी पायी जात असताना विशालने रस्त्यात तिचे तोंड दाबून अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र, या मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत या प्रकाराबाबत पालकांना सांगितले. त्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बुधवारी रात्री कल्याण पूर्व भागातून विशालला अटक केली. विशालवर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली आहे. तडीपारी संपल्याने तो पुन्हा कल्याणमध्ये आला आहे.

पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय या प्रकारामुळे हादरले असताना पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याबद्दल ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आक्षेप नोंदवला. काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempted rape on minor girl in kalyan accused arrested strict action demanded ysh