ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर निकटवर्तीय सोडून गेल्याने ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे एकाकी पडले असतानाच, आता मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून मोट बांधून आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यात आठ माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यानिमित्ताने आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा-मुंब्रा परिसर येतो. जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांचे विळा-भोपळ्याचे नाते असून यातूनच त्यांच्यात मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयवादाची लढाई रंगताना दिसून येते. त्यात गेल्या काही महिन्यांपासून मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बंडाची तयारी करीत असून त्यांना शिंदे गटाचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. या भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे हे या बंडाचे शिलेदार मानले जात आहेत. हे माजी नगरसेवक मुंब्रा विकास आघाडीची स्थापना करून त्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना शह देतील, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून ही चर्चा आता खरी ठरताना दिसून येत आहे. राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आठ माजी नगरसेवकांनी मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात छाननी प्रक्रिया नुकतीच पार पडल्याने आघाडीची नोंदणी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा – विवेकानंद सेवा मंडळातर्फे हरित डोंबिवलीचा संकल्प
राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे दोघे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. परंतु त्यांनी पक्षातील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले असून यामुळे आव्हाड हे एकाकी पडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मुल्ला हे आव्हाड यांच्यापासून दुरावले होते. तेव्हापासूनच मुल्ला हे आव्हाड यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. आता पक्षातील फुटीनंतर या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. तर, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी यापूर्वी आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांना मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आव्हाडांपुढे आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्पात असून येत्या आठ दिवसांत ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. या आघाडीमध्ये माझ्यासह राष्ट्रवादीचे आठ माजी नगरसेवक आहेत. आघाडी स्थापन झाल्यानंतर मुंब्य्रातील राष्ट्रवादी तसेच इतर पक्षाचे माजी नगरसेवक सामील होतील. – राजन किणे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी