लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील श्री गणेश मंदिर देवस्थानच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या संकल्पनेतून फडके रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईचे अनावरण गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा व प्रवचनकार अलका मुतालिक, विश्वस्त राहुल दामले यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, जिल्हा संघटक हर्षद पाटील, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्षा दीपिका पेडणेकर उपस्थित होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नानानंतर फडके रोडवर एकत्र जमण्याची मागील अनेक वर्षाची परंपरा आहे. या परंपरेनुसार रविवारी पहाटेपासून फडके रोडवर मोठ्या प्रमाणात तरुणाई येणार आहे. गणपती दर्शनानंतर तरुण, तरुणांना फडके रोडवर उभे राहून आकर्षक विद्युत रोषणाई सोबत सेल्फी काढता यावी हाही या रोषणाई मागील मुख्य उद्देश आहे, असे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा-उद्धव ठाकरेंची गजानन कीर्तिकर-रामदास कदम वादावर पहिली प्रतिक्रिया; “गद्दारांच्या वाटा..”
दरवर्षी दिवाळी सणाच्या काळात फडके रोडवर रोषणाई केली जाते. यावेळी डोंबिवली गावचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे हे शंभरावे वर्ष असल्याने फडके रोडवर, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करून देण्याची आमदार राजू पाटील यांनी मंदिर संस्थानकडे केली होती. संस्थानच्या विश्वस्त मंडळाने या मागणीला मंजुरीला दिली. त्यानंतर ही रोषणाई करण्यात आली.
विद्युत रोषणाईने फडके रोडवरील झाडे, विद्युत खांब, कमानी आकर्षक पध्दतीने सजविण्यात आली आहेत. संध्याकाळी सात नंतर डोंबिवलीकर विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अधिक संख्येने येत आहेत. लहान मुलांचे रोषणाई सोबत सेल्फी, छायाचित्रे काढत आहेत. रोषणाई सोबत भगवे आकाश चमचमणारे आकाश कंदिल रोषणाई मधील विशेष आकर्षण आहे. रोषणाई उद्घाटन कार्यक्रमाला उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक, योगेश पाटील, ग्रामीण विधानसभा सचिव अरूण जांभळे, उदय वेळासकर, संदीप म्हात्रे, कोमल पाटील उपस्थित होते.