अंबरनाथ, बदलापूरमधील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे प्रवासी त्रस्त; नियमांच्या उल्लंघनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

वाढत्या नागरीकरणामुळे चौथी मुंबई म्हणून ओळख मिळवत असलेल्या अंबरनाथ, बदलापूर शहरालाही रिक्षाचालकांच्या मनमानी आणि मुजोरीला सामोरे जावे लागते आहे. बेकायदा रिक्षा थांबे, मोठय़ा प्रमाणावर वाढलेली रिक्षांची संख्या आणि त्या तुलनेत अतिशय अरुंद असलेले रस्ते यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.

बदलापूर शहरात बेकायदा रिक्षा थांब्यांचे पेव फुटले असून शहराच्या पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर तब्बल सात ते आठ रिक्षा थांबे आहेत.पूर्वेलाही चार ते पाच रिक्षा थांबे आहेत. यात जुन्या-नव्या अशा सर्वच रिक्षांचा सहभाग आहे. गेल्या काही वर्षांत क्षमतेपेक्षा अधिक रिक्षा थांब्यांवर आल्याने भली मोठी रांग रस्त्याच्या कडेला लागलेली दिसते. पश्चिमेला वैशाली टॉकीजशेजारी असलेल्या रिक्षा थांब्यामुळे आधीच चिंचोळ्या असलेल्या रस्त्याचा एकतृतीयांशपेक्षा अधिक भाग व्यापला गेला आहे. त्यामुळे शेजारीच असलेल्या रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागते. यात बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील पूर्वेला रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे एकीकडे रस्त्याचा मोठा भाग वाहतुकीसाठी बंद असताना, दुसरीकडे उर्वरित रस्त्यावर रिक्षाचालकांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांची आणि वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होते आहे. रिक्षाचालकांच्या प्रवासी उतरवण्यासाठीच्या जागेमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. संध्याकाळी लोकल आल्याने प्रवासी बाहेर पडताच, रिक्षाचालक प्रवाशांसाठी भर रस्त्यात रिक्षा थांबवतात. अनेकदा एखादा प्रवासी कमी असल्यास तो प्रवासी मिळेपर्यंत रिक्षाचालक रिक्षा जागेवरून हलवत नाहीत. मग त्यामुळे कितीही वाहतूक कोंडी झाली तरी त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यात रस्त्याच्या निम्म्या भागात काँक्रिटीकरणाचे काम सरू असल्याने निम्माच रस्ता वापर योग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांची ही मुजोरी अधिक प्रमाणात दिसून येते. प्रवासी मिळवण्याच्या वादात अनेकदा रिक्षाचालकांतच भांडणे पाहायला मिळतात. त्यामुळे इतर वाहनचालकांचा मात्र खोळंबा होतो.

भूमिपुत्रांच्या नावाने राजकारण

रिक्षाचालकांमधील अंतर्गत वाद असोत वा प्रवासी आणि रिक्षाचालकांत झालेले वाद असोत, हे सर्व वाद भूमिपुत्र आणि स्थानिक कोण इथपर्यंत पोहोचतात. त्यामुळे प्रवासीही रिक्षाचालकांची मुजोरी अनेकदा खपवून घेतात. दोन महिन्यांपूर्वी रेल्वेने बंद केलेली चोरवाटाही एका भाजप नगरसेवकाने रिक्षाचालकांसाठी खुल्या करून दिली होती.त्यामुळे रिक्षाचालकांच्या या मुजोरीला राजकारण्यांचाही पाठिंबा आहे.

बैठकीनंतरही कार्यवाही नाही

रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या १५ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वाहतूक विभागासोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिले होते. त्यानंतर वाहतूक शाखा, पोलीस आणि पालिका प्रशासन यांची बैठक झाली. मात्र त्यानंतर १५ दिवस उलटूनही काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

उड्डाणपूल ओलांडण्यासाठी दुप्पट भाडे

बदलापूर शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी तीस रुपये भाडे रिक्षाचालकांनीच ठरवून दिले होते. मात्र सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचे असल्यास थेट ६० रुपयांची मागणी केली जाते. मग त्यात फक्त पूल ओलांडायचा असला तरीही दुप्पट भाडे आकारले जाते. त्यामुळे अनेकदा प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये खटके उडत असतात.