डोंबिवलीतील रजिता जाधव केवळ महिला प्रवाशांचीच वाहतूक करणार
डोंबिवलीतील पहिली स्त्री रिक्षाचालक म्हणून मान मिळालेल्या रजिता जाधव यांच्या रिक्षेला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परवाना दिल्याने मंगळवारपासून रजिताने डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्ता रिक्षा वाहनतळावरून प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली. रजिता आपल्या रिक्षेतून फक्त स्त्री प्रवाशांची वाहतूक करणार आहे. त्यामुळे डोंबिवलीत प्रथमच महिलांसाठी विशेष रिक्षा सुरू करण्याचा मान या रजिताला मिळाला आहे.
परिवहन विभागाचे साहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी राजेश सरक, वाहतूक निरीक्षक जयवंत नगराळे, दिलीप चव्हाण यांनी मंगळवारी रिक्षा वाहनतळावर रजिताचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आणि तिला प्रवासी वाहतुकीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी रिक्षाचालक मालक संघटनेचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे उपस्थित होते. अनेक वर्षांनी प्रथमच एक स्त्री पांढऱ्या गणवेशात डोंबिवलीत रिक्षा चालवीत असल्याने डोंबिवलीकरांसाठी हा कौतुकाचा विषय ठरला आहे.
डोंबिवली परिसरात महिला रिक्षा प्रवाशांची संख्या बरीच मोठी असून सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत या प्रवाशांचे हाल होताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे आपल्या रिक्षेतून महिला प्रवाशांची वाहतूक प्राधान्याने केली जाईल, असे रजिता यांनी स्पष्ट केले. रिक्षा थांब्याच्या नियमाप्रमाणे कुणा प्रवाशाला भाडे नाकारणे नियमाला धरून नसले तरीही केवळ महिलाच प्रवाशाने आपल्या रिक्षातून प्रवास करावा असा आग्रह धरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader