मध्यरात्रीचा प्रकार; ठाणे स्थानकात प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे
मंगळवारी रात्री एकची वेळ. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर तुरळक गर्दी. इंडिकेटरवर अंबरनाथ ट्रेन दोन मिनिटांत अपेक्षित. तेवढय़ात एसटी स्थानकाच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वारातून एक रिक्षा थेट फलाटावर येते. वेगाने आणि अचानक रिक्षा फलाटावर आलेली पाहून प्रवाशीही गांगरुन जातात. रिक्षावाला रिक्षा फलाटावर वेगात पुढे नेतो आणि बसण्यासाठी असलेल्या बाकडय़ाला वळसा मारतो. रेल्वे रुळांपासून अवघ्या काही फुटांवर आलेली रिक्षा तो फिरवतो आणि जोरात बाहेरच्या दिशेने नेऊ लागतो. रिक्षाच्या वेगाने प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. तेवढय़ातच ट्रेन फलाटावर येत असल्याची घोषणा होते. रिक्षा बाहेर काढण्याच्या प्रयत्नात फलाट आणि रस्ता यांच्यात अंतर असल्याने पुढचे चाक अडकते. चक्रावलेले प्रवासी एकत्र येतात आणि रिक्षा सरळ उचलून रस्त्यावर नेऊन ठेवतात. सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकातील मध्यरात्रीनंतरचे हे थरारनाटय़!
मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानके प्रचंड गर्दीची असल्याने दहशतवाद्यांचे सातत्याने लक्ष्य ठरतात. हल्ला झाला की मेटल डिटेक्टर आणि तत्सम सुरक्षा उपायांविषयी चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात आपल्या रेल्वे स्थानकांमधील सुरक्षाव्यवस्था किती अपुरी आहे याचा प्रत्यय या घटनेनिमित्ताने आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर डाऊन धीम्या मार्गावरील गाडय़ा येतात. सातत्याने गाडय़ांचे आगमन, निर्गमन होणारा असा हा व्यस्त फलाट आहे. याच फलाटाच्या कल्याण दिशेला आत व बाहेर येण्याजाण्यासाठी जागा आहे. बाजूलाच असणाऱ्या एसटी स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस, टीएमटीच्या बसेस आणि खाजगी गाडय़ा या सगळ्यामुळे हा परिसर सातत्याने गजबजलेला
असतो. मुळातच हे अधिकृत प्रवेशद्वार नसल्याने सुरक्षातपासणीकरता मेटल डिटेक्टरसारखी कोणतीही यंत्रणा नाही. फलाटाबाहेर लगेचच रस्ता असल्याने कोणीही व्यक्ती सहजपणे रेल्वे स्थानकात शिरू शकते आणि बाहेरही पडू शकतो. मंगळवारी रात्री रिक्षा फलाटापर्यंत पोहचल्याने ठाणे स्थानकातील सुरक्षाव्यवस्था किती रामभरोसे आहे हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे बुलेट ट्रेनच्या घोषणा होत असताना मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा ऐशीतैशी आहे हे सिद्ध झाले आहे. ठाण्यासारख्या संवेदनशील रेल्वे स्थानकातील सुरक्षा घोळाकडे मध्य रेल्वे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे.

..अनर्थ टळला
भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाला रोखण्यासाठी कोणताही यंत्रणा फलाटावर नव्हती. तसंच रिक्षा फलाटावर आली त्यावेळी ट्रेन आलेली नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रसंग ऐन गर्दीच्या वेळी घडला असता तर काय घडले असते याची कल्पना न केलेलीच बरी.

Story img Loader