विरार ते अर्नाळा ४० रुपयांऐवजी ८० रुपये; विविध पर्यटनस्थळीही दुप्पट भाडे

वसई परिसराला विपुल निसर्गसंपन्नता आणि नयनरम्य समुद्रकिनारे लाभल्याने डिसेंबर, जानेवारी महिन्यांत पर्यटकांचा ओघ वाढलेला असतो. मात्र रेल्वे स्थानकापासून पर्यटनस्थळी सोडण्यासाठी रिक्षाचालक पर्यटकांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचे दिसून आले आहे. विरार स्थानकापासून अर्नाळा येथे सोडण्यासाठी नेहमी ४० रुपये आकारले जातात, मात्र सध्या पर्यटकांकडून ८० रुपये आकारत असल्याची माहिती पुढे आली आहे. अन्य पर्यटनस्थळी दुप्पट भाव आकारत असल्याचे चित्र आहे.

वसई-विरार परिसरातील समुद्रकिनारे, रिसॉर्ट, धार्मिक स्थळे, पुरातन वास्तू पाहण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र डिसेंबर महिन्यात गर्दी वाढते. नाताळ उत्सवा आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी परिसरातील समुद्रकिनारी पर्यटक येत असतात. गुलाबी थंडीचे आगमन, शाळेला आठवडाभर नाताळची सुटी आणि विविध महोत्सव यांमुळे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र याचा गैरफायदा रिक्षाचालक घेऊ लागले आहेत.

बाहेरील पर्यटक असल्याने रिक्षाचालकांनी त्यांच्याकडून भरमसाठी भाडे आकारत आहेत. वर्षभर २० ते ३० रुपये असणारे भाडे सध्या ७० ते ८० रुपयांपर्यंत वाढले आहे. सहा आसनी रिक्षा ३०० ते ३५० रुपये असे दर सांगतात. शेअर रिक्षा असली तरी आसनाप्रमाणे भाडे न घेता अंदाजे भाडे घेतले जाते.

विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी जाण्यासाठी प्रवाशामागे ४० रुपये आकारले जातात. मात्र सध्या ८० रुपये प्रति प्रवासी आकारले जात आहेत. अर्नाळा बस स्थानकाहून रिसॉर्टला जाण्यासाठीही रिक्षाचालकांकडून ३० रुपये आकारले जात आहेत.

रिक्षाचालक जास्त भाडे सांगत आहेत हे आम्हाला माहीत आहे. मात्र परिवहनच्या बससेवेची कमतरता, या भागाची माहिती नसल्याने नाइलाजाने पैसे द्यावे लागतात. रिक्षाचालक दुप्पट भाव आकारत असून काही प्रवाशांकडून तर ३०० पेक्षा अधिक भाडे आकारले गेले आहे.       – प्रियांका गोतपागार, पर्यटक

रिक्षाचालक परस्पर दरवाढ करतात. त्याबद्दल उपप्रादेशिक परिवहन विभागाला कळवले आहे. परस्पर दरवाढ न करण्याच्या सूचना रिक्षाचालकांना केल्या आहेत. कुणी नियमानुसार जास्त भाडे आकारत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.    – संपत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

 

Story img Loader