कल्याण- कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गाव हद्दीतील टाटा कंपनीच्या आवारात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आला असून यानंतर कल्याण वन विभागाने बिबट्याचा वावर असलेल्या गावात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. लहान मुले, गोधन आणि रात्रीच्या वेळेत बाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची, याविषयी वन कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना माहिती देण्यात येत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण जवळील वरप गाव हद्दीतील टाटा कंपनीच्या आवारात बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बिबट्याने आवारात प्रवेश केल्यापासून ते बंद असलेल्या मुख्य प्रवेशव्दारातून बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड कंपनीच्या सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास येताच सुरक्षारक्षकांनी हि माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गस्त, बचाव पथकाने तातडीने वरप गाव हद्दीत धाव घेऊन या भागातील बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. सकाळपर्यंत वरप, वसद, जांभूळ भागातील घनदाट जंगलात वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तो आढळून आला नाही. वरप परिसरात बिबट्याचा वावर असल्याने विभागीय वन अधिकारी संजय चन्ने यांच्या सूचनेवरून वनपाल, वनरक्षक यांनी कल्याण ग्रामीण मधील घनदाट जंगलाचा भाग असलेल्या, बिबट्याचा वावर असलेल्या गावे, आदिवासी पाड्यांवर जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. बिबट्या दिसून आला तर घ्यावयाची काळजी, शेतकऱ्यांनी जंगलात गोधन चरायला नेताना घ्यावयाची काळजी, लहान मुले, रात्रीच्या वेळेत एकट्याने प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयीची माहिती वन कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात येत आहे. वन विभागाचे विशेष गस्ती पथक कल्याण ग्रामीण भागात तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेची मोर्चेबांधणी

फटाक्यांमुळे मार्गक्रमण

कल्याण ग्रामीण मधील जांभूळ, वसद हा परिसर घनदाट जंगलाचा आणि मुबलक पाण्याचा परिसर आहे. या भागात बिबट्याचा नियमित वावर असतो. आताही बिबट्या या भागात अधिवास करून असावा. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या मोठ्या आवाजांमुळे बिथरून बिबट्याने आपले ठिकाण बदलले असावे. तो मार्गक्रमण करत आपला नेहमीचा मार्ग फटाक्यांच्या आवाजांमुळे चुकल्याने, किंंवा भक्ष्याच्या शोधार्थ टाटा कंपनीच्या आवारात आला असावा. असे जंगली प्राणी कधीही एका जागी राहत नाहीत. त्यामुळे मार्ग चुकलेला बिबट्या पुन्हा आपल्या मार्गाने गेला असण्याचा अंदाज आहे. कल्याण ग्रामीण, बदलापूर ग्रामीण, बदलापूर ते बारवी धरण परिसरात घनदाट जंगल आहे. येथे बिबट्याचा वावर आहे. भक्ष्याचा शोधार्थ जंगलातून बाहेर पडलेला बिबट्या नागरीकरण झालेल्या भागात अचानक येतो, असे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले.

“ वरप परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने कल्याण ग्रामीण मधील जांभूळ, वसद, परिसरातील गावे, आदिवासी पाड्यांमध्ये सुरक्षितेतचा उपाय म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. विशेष गस्ती पथक या भागात कार्यरत आहे.”- संजय चन्ने, विभागीय वन अधिकारी, वन विभाग, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awareness campaign by forest department in kalyan rural due to leopard presence amy
Show comments