वर्षभरात १ हजार २७० रस्ते अपघात; ८०४ जण जखमी; अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानातून जनजागृती
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : मद्यपान करून वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे यामुळे पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात. हे अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक आणि वाहतूक विभाग वसई यांच्या वतीने नुकताच रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत जनजागृती करण्यात आली आहे. २०१९ या वर्षांत जिल्ह्य़ात एक हजार २७० छोटे मोठे अपघात झाले असून त्यामध्ये ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८०४ जण जखमी झाले असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
जिल्ह्यात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई केली जाते. परंतु अतिवेगाने वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन, मद्यपान करून वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, अशा विविध कारणांमुळे अपघात होत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत, परंतु त्याचे पालन होत नसल्याने या अपघाताला पायबंद घालणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१८ साली वर्षभरात १३६० अपघात झाले होते. त्यामध्ये ५०५ जणांचा मृत्यू झाला होता, परंतु यंदाच्या वर्षी ऑनलाइन चलान आणि मद्यपींवरील कारवाईमुळे २०१९ मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१९मध्ये १२७० रस्ते अपघात झाले. त्यात ४४८ जणांचा मृत्यू झाला. यात जास्तीत जास्त तरुणांचा समावेश आहे. असे अपघात रोखण्यासाठी यानंतर अजून कारवाई तीव्र करून बेशिस्त वाहनचालक आणि मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला जाईल अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.
नऊ लाखांचा दंड
* रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी नुकतेच वसई वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्यातर्फे ‘रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
* सप्ताहाचा समारोह सोहळा वसईत झाला. याप्रसंगी वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, सिनेकलाकार सुदेश भेरी, हर्षदा बामणे, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध उपRम राबविले. यात जागोजागी सूचना फलक लावणे, जनजागृती, रस्ते सुरक्षाविषयक मार्गदर्शन, पथनाटय़ अशा उपक्रमातून वाहतूक विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. या सात दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन हजार २२८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून नऊ लाखांचा दंड वसूल करण्यात आले.
वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना
वसई विरार शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे, याचा नागरिकांनाही त्रास सहन करावा. नागरिक कोणत्याही ठिकाणी वाहने पार्किंग करून निघून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. यावर नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या सहकार्याने एक दिशा मार्ग, नो पार्किंग झोन, ना फेरीवाला क्षेत्र, विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, अशा विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी २०२० मध्ये प्रयत्न केले जाणार आहेत.
रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्न करीत असतो. यासाठी वाहनचालकांनीही सजगपणे नियमांचे पालन करून वाहने चालवावी. वाहने चालविताना स्वत:ची काळजी घ्यावी.
-विलास सुपे, वाहतूक पोलीस निरीक्षक वसई
अपघातनामा
सन अपघात मृत्यू
२०१३ १८३४ ४२९
२०१४ १८२९ ४०६
२०१५ १७९७ ५०४
२०१६ १३२७ ३७०
२०१७ १४५३ ४८७
२०१८ १३६० ५०५
२०१९ १२७० ४४८