फेरीवाल्यांनी गजबजलेल्या कल्याण व डोंबिवली स्थानक परिसराकडे एरवी ढुंकूनही न बघणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या भागात दौरे सुरू केले असून पादचाऱ्यांना रस्ते आणि पायवाटा मोकळ्या करून द्या, असे आदेश दिले जात आहेत.कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील स्कॉयवॉक असो अथवा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर. या भागात नेहमी बेकायदा फेरीवाल्यांचा गजबजाट असतो. यामुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करणारे रहिवासी अक्षरश: मेटाकुटीस आले असताना गेली अनेक र्वष सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरून कधीच जाहीर भूमिका घेतलेली नाही. निवडणुकीच्या तोंडावर मात्र पालकमंत्री एकनाथ िशदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत स्थानक परिसरात दर्शन देऊ लागले आहेत.विधानसभा निवडणुकांमध्ये कल्याण-डोंबिवलीतून भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. येथील मतदारांची दुखरी नस लक्षात घेऊन भाजपच्या स्थानिक आमदारांनी तातडीने स्थानक परिसराचा पाहणी दौरा सुरू केला आणि येथील फेरीवाल्यांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली. भाजपचे स्थानिक नेते आक्रमक होत असताना शिवसेनेचे नगरसेवक आणि नेत्यांनी मात्र यासंबंधी बघ्याची भूमिका घेतली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त ई.रवींद्रन यांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे सक्त आदेश मध्यंतरी स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार या भागात जोरदार कारवाई सुरू असून डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर अजूनही बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापला आहे. हे लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ िशदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन नुकतीच डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश या वेळी िशदे यांनी दिले.
चर्चेला ऊत
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांचा हा स्थानक दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डोंबिवली स्तानक फेरीवाला मुक्त करा, अशी मागणी मध्यंतरी खासदार श्रीकांत िशदे यांनी लावून धरली होती. मात्र, खासदारांच्या या मागणीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. निवडणूक तोंडावर येताच एकनाथ िशदे ठाणे स्थानक परिसराचा असाच दौरा करतात, याची चर्चा या वेळी रंगली होती. निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर मात्र ठाण्यात पुन्हा फेरीवाल्यांचा गजबजाट सुरू होतो. डोंबिवलीचा दौराही असाच फार्स ठरेल का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा