जन्मदिवस असो की लग्नाचा वाढदिवस. इतर मेन्यू कोणताही असो, पण केक लागतोच. अशा प्रकारचे समारंभ केकशिवाय पूर्णच होत नाहीत. त्यामुळे अशा समारंभांनिमित्त वरचेवर केक खाल्ला जातो. मात्र हल्ली असे कोणतेही प्रयोजन नसतानाही सहज आवडीने केक खाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कॉफी शॉप्सप्रमाणेच केकशॉप्स थाटण्यात आली आहेत. बदलापूरमध्येही ‘ऑसम केक’ नावाचे एक केकचे दुकान आहे. निरनिराळ्या स्वादांच्या चविष्ट केकसाठी या शॉप्सची ख्याती आहे.
केकनिर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले जयेश आणि श्वेता बेंडखळे यांनी २०११ मध्ये घरच्या घरीच केक बनविण्यास सुरुवात केली. सध्या हेंद्रेपाडा, गांधी चौक, यादवनगर आणि कात्रप अशा चार ठिकाणी ‘ऑसम केक’च्या शाखा आहेत. उत्तम निर्मितीमूल्य आणि चवीमुळे या केकला मागणी वाढत गेली. त्यांनी बदलापूरमधील बेलवली येथे केकनिर्मितीचा कारखाना सुरू केला. मागणी वाढल्यानंतर हेंद्रेपाडा येथे या दोघांनी आपले पहिले ‘ऑसम’ हे केकचे दुकान सुरू केले. केकच्या चवीतून आलेल्या प्रतिक्रियेतूनच ‘ऑसम’ हे नाव पडले असावे. सध्या बदलापुरात चार ठिकाणी ‘ऑसम केक’ची दुकाने आहेत.केक, पेस्ट्री आणि चॉकलेट बॉल या गोष्टी येथे तयार करून विकल्या जातात. थ्री डी केक हा त्यातलाच एक प्रकार. मागणीनुसार प्रत्येक वस्तू वा चित्राचे थ्री डी रूप केकला देण्याचे काम केले जाते. मग तो मोबाइल असो वा बाहुली, कार असो वा कपडय़ांची प्रतिकृती. यासोबतच मिठाई केक, रसगुल्ला आणि रसमलाई यांची चव असलेले केकही येथे आपल्याला चाखायला मिळतात. त्यातील रसमलाई केकला चांगली मागणी असल्याचे श्वेता सांगतात. ऋतूंप्रमाणे बाजारात येणाऱ्या ताज्या फळांचा वापर करून तयार केलेल्या फ्रुट केकलाही चांगली पसंती मिळते. तसेच ऑलबेरीचा वापर करून तयार केलेले केकही केकप्रेमींना आवडतात, असे जयेश सांगतात. यासह डच, ओपेरा, बेल्जियम, ड्रीम, कॅफेचिनो, किटकॅट अशा पन्नासहून अधिक केकचे प्रकार येथे मिळतात. त्यात स्टेअरकेक, स्टँडकेकअसे विविध स्तरांचे केकही तयार केले जातात.
सतत नवे देत राहणे हे ‘ऑसम’चे वैशिष्टय़ आहे. त्याचबरोबर येथे नागरिकांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जाते. सध्या अनेकांना फॅटची चिंता अधिक असते. त्यामुळे आम्ही सहसा ‘लो फॅट’ अशा वस्तूंचाच वापर करून केक तयार करतो. चवीसोबत स्वच्छता हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत असतो, असे श्वेता सांगतात. हेंद्रेपाडा येथे असलेल्या केकच्या कारखान्यात सर्व केक तयार केले जातात. अगदी तासाभरापूर्वीही मागणी केल्यास त्यानुसार केकची निर्मिती करून देण्यात येते. सजावट करीत असताना ‘ऑसम केक’मध्ये प्लास्टिक आणि शरीरासाठी हानीकारक वस्तू टाळण्यात येतात. सध्या येथे वजनानुसार केकच्या किमती आपल्याला पाहायला मिळतात. येथे १६० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचे केक मिळतात.
एगलेस प्लमकेक
डिसेंबरमध्ये प्लमकेकला अधिक मागणी असते. त्यात बहुतेकदा अंडी आणि वाईन याचा वापर केला जातो. मात्र या दोन गोष्टी टाळून ऑसम केक शॉपमध्ये केक तयार केले जातात.या अंडी आणि वाइनरहित केकनाही बरीच मागणी असते.
कुठे – ऑसम केक, हेंद्रेपाडा, कात्रप, बदलापूर
कधी – सकाळी १० ते रात्री १०.