उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर योगगुरु बाबा रामदेव यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तसेच, अमृता फडणवीस यांचे तरुण राहण्यामागील कारण देखील बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे.
ठाण्यात हायलँड मैदानात योग गुरु रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. तेव्हा खासदार श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस, आमदार रवी राणा, दीपाली सय्यद उपस्थित होते. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
बाबा रामदेव म्हणाले, “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्ष ते म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे,” असे बाबा रामदेव यांनी उपस्थितांना सांगितलं.
हेही वाचा : “…अन्यथा रट्टे देईन”, संतोष बांगर यांची पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला दमदाटी
दरम्यान, याच शिबिरात बोलताना बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी म्हटलं, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात,” असे विधान बाबा रामदेव यांनी केलं.