ठाणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ठाणे रेल्वे स्थानक परिसर, कोर्टनाका भागात मिरवणूका निघणार आहेत. या मिरवणूका दरम्यान कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोर्टनाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच सोमवारी सायंकाळी मिरवणूका देखील निघणार आहे. स्थानक परिसर, कोर्टनाका भागातून मोठ्याप्रमाणात वाहतुक होत असते. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा भार वाढण्याची शक्यता आहे.
असे आहेत वाहतुक बदल
– ठाणे वाहतुक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचने नुसार, जीपीओ येथून कोर्टनाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीओ येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्गे, दादोजी कोंडदेव स्टेडियम, अग्निशमन दल, बाजारपेठ मार्गे वाहतुक करतील. कळवा खाडी पूल येथून उर्जिता उपाहारगृह, कोर्टनाकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने उर्जिता उपाहारगृह येथून ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्गे, जीपीओ मार्गे वाहतुक करतील. सॅटीस पुलावरून टीएमटी बसगाड्यांची वाहतुक होत असते. तर रेल्वे स्थानकाजवळील राज्य परिसवहन सेवेच्या एसटी थांब्यावरील एसटी बसगाड्या देखील सॅटीस पूल मार्गे वाहतुक करतात.
या बसगाड्या सॅटीस पुल परिसर, टाॅवर नाका, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतात. येथून वाहतुक करणाऱ्या बसगाड्या तसेच रिक्षा आणि चार चाकी वाहनांना मुस चौक येथे प्रवेशबंदी असेल. सॅटीस पुलावरून सुटणाऱ्या टीएमटी आणि एसटी बसगाड्या गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास मार्गे वाहतुक करतील. तर रिक्षा आणि चारचाकी वाहने मुस चौकातून उजवीकडे वळण घेऊन वाहतुक करतील. कोर्टनाका ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जांभळीनाका, छत्रपती शिवाजी महाराज पथ, अग्यारी मार्ग, मुस चौक ते पंजाब अलोक उपाहारगृह, मासुंदा तलावाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई असेल. हे वाहतुक बदल सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील.