माजीवडा येथील एका इमारतीच्या दुरूस्ती दरम्यान सिमेंटचा गोळा सुमारे दीड वर्षीय मुलाच्या डोक्यात पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी हा प्रकार घडला असून शुक्रवारी या घटनेप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात ठेकेदार रवि पाटील याच्याविरोधात निष्काळजीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजीवडा येथील गावात हृदान नायर हा सुमारे दीड वर्षीय मुलगा त्याच्या आई- वडिलांसह एका इमारतीत राहत होता. त्यांच्या राहत्या इमारतीचे दुरूस्ती काम सुरू होते. त्याचा ठेका रवि पाटील याला मिळाला होता. हे दुरूस्ती काम सुरू असताना रवि पाटील याने इमारतीखालून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नव्हती.

१२ मे या दिवशी हृदानला त्याचे वडील फेरफटका मारण्यासाठी नेत होते. दोघेही इमारती खालून जात असताना एक सिमेंटचा गोळा हृदानच्या डोक्यात पडला. हृदानच्या वडिलांनी त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हृदानच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवि पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अद्याप अटक केली नाही.

Story img Loader