ठाणे : ठाण्यात शुक्रवारी माकडाच्या पिलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. पिलाचा मृतदेह मादी माकडाने पोटाशी धरून ठेवले होते. ही घटना पाहून अनेकांचे डोळे पानावले होते. मादी माकड आक्रमक असल्याने मृतदेह सायंकाळी उशीरापर्यंत वन विभागाला ताब्यात मिळाला नव्हता.
हेही वाचा >>> ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांच्याविरोधात वियनभंगाचा गुन्हा दाखल
वर्तकनगर येथील शिवाईनगर भागात एका सात ते आठ महिन्याच्या माकडाच्या पिलाचा शुक्रवारी दुपारी पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाचे पथके घटनास्थळी दाखल झाली. परंतु पिलाचा मृतदेह मादी माकडाने पोटाशी धरला होता. तसेच तिच्यासोबत पाच ते सहा माकडांचा समूह होता. त्यामुळे वन विभागाला हे माकडाचा मृतदेह ताब्यात घेणे शक्य झाले नाही. गुरुवारीही अशाचप्रकारे ठाण्यात एका माकडाचा विजेच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता.