ठाणे : के. ई.एम. या मुंबईतील नामांकित रुग्णालयात खोटी कागदपत्रे दाखल करून बाळाला जन्म देऊन त्याला अवैध पद्धतीने दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण येथे राहणाऱ्या दोन महिलांचा यात सहभाग असून ठाणे जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून दोन्ही महिलांविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे राज्यातील नामांकित रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.

मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात संपूर्ण राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामुळे हे रुग्णालय चोवीस तास वर्दळीने गजबजलेले असते. याचाच फायदा घेत कल्याण येथे राहणाऱ्या एका महिलेने रुग्णालय प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कल्याण येथील आडिवली – ढोकाळी परिसरात राहणाऱ्या एका शिल्पा नामक गरोदर महिलेने आपला पती नियमित दारू पित असून मी बाळाला सांभाळू शकत नसल्याचे सांगून बाळाला कोण सांभाळेल याचा शोध सुरु केला. यावेळी महिलेच्या परिचयातील शेहनाज या महिलेने बाळाला स्वीकारण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता बाळाची दत्तक प्रक्रिया या दोन्ही महिलांनी संगनमताने राबविली.

प्रकरण नेमके काय ?

कल्याण येथे राहणारी शिल्पा नामक महिला ऑक्टोबर २०२४ या महिन्यात के. ई.एम. रुग्णालयात प्रसूती साठी दाखल झाली. यावेळी तिने माझे नाव शेहनाज असल्याचे सांगून रुग्णालयात शेहनाज या महिलेचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्र सादर केले. तसेच बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाच्या जन्मदाखल्यावरही आई म्हणून शेहनाजचा उल्लेख केला. यानंतर शेहनजाला बाळ सोपवून शिल्पा तेथून निघून गेली. मात्र मागील काही दिवसांपासून बाळाची तब्येत बिघडल्याने त्याला शेहनाज या महिलेने परळ येथील वाडिया रुग्णालयात दाखल केले. यावेळी बाळावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया पार पडली आणि या दरम्यान बाळाला एचआयव्ही विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर आईची ही तपासणीची वेळ आली असता, शेहनाजने मी बाळाची खरी आई नसल्याची कबुली दिली. यानंतर वाडिया रुग्णालय प्रशासनाने मुंबईतील सखी केंद्राला माहिती दिली. यानंतर सर्व प्रकरण समोर आले. याबाबत ठाणे जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयाचा निष्काळजीपणा ?

या प्रकरणामध्ये महिलेने प्रसूतीसाठी दाखल होते वेळी दुसऱ्याच महिलेचे कागदपत्र सादर केले. याउपर बाळाच्या जन्म दाखल्यावरही जन्मदात्या आई ऐवजी दुसऱ्याचे अर्थात शेहनाजचे नाव ही टाकून घेतले. मात्र या सर्व प्रकरणात रुग्णालय प्रशासनाला या खोट्या कागदपत्रांबाबत कुठेही गैरप्रकार होत असल्याबाबत समजले नाही. रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजीपणाच्या बाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Story img Loader