पालकमंत्र्यांचे महापालिकांना आदेश
ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्वापूर्वी कोणत्याही परिस्थिती बुजविण्याचे आदेश जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत दिले. वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे हा संवेदनशील विषय असून त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. तसेच गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच कालावधीत आले असून हे दोन्ही सण कोणत्याही अनुचित प्रकाराविना दरवर्षीप्रमाणे शांततेत आणि एकोप्याने कसे पार पडतील, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना या वेळी केल्या.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी गणेशोत्सवापूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके, भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त मनोहर हिरे, मीरा-भाईंदर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव आणि मोहरम या दोन्ही सणांच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रेल्वे, एसटी सेवा सुरळीतपणे सुरू राहावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळांत १०८० सार्वजनिक तर दीड लाख घरगुती गणेशमूर्तीची आणि २० हजार गौरींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांची पूर्ण तयारी झाली असून शहरात साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बैठकीत दिली. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन आखण्यात आल्याचे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी बैठकीत सांगितले. तर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात १०४० सार्वजनिक आणि ४० हजारापेक्षा जास्त खासगी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले. ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून रस्त्यांवरील खड्डे बुजविले असून त्याप्रमाणे अन्य महापालिकांनीही गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावेत, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत केल्या.
एसटीच्या ८०० बसेस
कोकणात व इतर ठिकाणी गणेशोत्सवासाठी ८०० बसेसचे आरक्षण पूर्ण झाले असून ४५० बस गाडय़ा गटांनी आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत केली. तसेच इतक्या बस गाडय़ांची ठाणे शहरातून वाहतूक करण्यास त्रासदायक होत असून कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका येथील सेवा रस्त्यांवर या बस गाडय़ा उभ्या करण्यास दोन दिवसांसाठी परवानगी देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.