ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील पनवेल कडे जाणाऱ्या फलाटाच्या एका टोकाला रेल्वे स्थानक परिसरात जमा होणारा ओला, सुका कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी साठवून ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठेवण्यात आलेल्या या कचऱ्याला दुर्गंधी सुटली आहे. पनवेल फलाटावर येणाऱ्या प्रवाशांना या दुर्गंधीचा त्रास सहन करत फलाटावर उभे राहावे लागते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

अनेक प्रवाशांनी ठाणे स्थानकातील पनवेल रेल्वे फलाटावर एका कोपऱ्यावर सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा साठवून ठेवला. त्यामुळे दुर्गंधी येत आहे, अशा तक्रारी ठाणे स्थानक व्यवस्थापकांकडे केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही, असे प्रवाशांनी सांगितले. सकाळच्या वेळेत पनवेलकडे जाणारी लोकल पकडताना कचरा साठवून ठेवलेल्या भागात उभे राहावे लागते. त्यामुळे दुर्गंधीने असह्य होते. अनेक प्रवाशांना ही दुर्गंधी सहन होत नसल्याने वांती करतात.

हेही वाचा >>> कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मामणोली येथे हमीभाव भात खरेदी केंद्र

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाट, दर्शनी भाग स्वच्छ ठेवणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना पनवेलकडे जाणाऱ्या फलाटावरील कचरा आणि दुर्गंधी दिसत नाही का, असे प्रश्न प्रवाशी करत आहेत. विविध साथीचे आजार सुरू आहेत. गोवरने सध्या धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र स्वच्छता राखण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा परिस्थितीत ठाणे स्थानकातील पनवेलकडे जाणाऱ्या फलाटावरील दुर्गंधी, साठवण कचरा रेल्वे अधिकाऱ्यांना दिसत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस सतत ठाणे स्थानक परिसरात गस्त घालत असतात. त्यांनाही ही दुर्गंधी दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या भागात कचरा साठवण करण्यात आली आहे. त्या भागात आकर्षक पध्दतीने भिंती रंगविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Story img Loader