बदलापूरः बदलापुरातून बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीत पोहायला उतरणाऱ्या व्यक्तींचा बुडून मृत्यू होण्याच्या घटनांत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे नदी किनारी उपाययोजना करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांना आवर घालण्यासाठी धोक्याची ठिकाणे ओळखून तेथे इशारा फलक लावले जाणार आहेत. तसेच येथे बचावासाठी यंत्रणा उभारण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणारी उल्हास नदी पर्यटनाचाही केंद्र आहे. भिमांशकरच्या डोंगरातून उगम पावणारी आणि कर्जत, वांगणी, बदलापूर, उल्हासनगर अशी वाहणारी उल्हास नदी किनार अनेकांना आकर्षित करतो. त्यामुळे नदीच्या किनारी आणि आसपासच्या भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पर्यटन केंद्र, खासगी शेतघरे, रिसॉर्ट विकसीत झाले आहेत. तसेच बारमाही वाहत असल्याने अनेक जण नदी किनारी फेरफटका मारण्यासाठी मजा करण्यासाठी जात असतात. अनेकदा पर्यटक पाण्यात उतरत असतात. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण बुडत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या काही वर्षात अशा घटना वाढल्या आहेत. धुळवडीच्या दिवशी याच उल्हास नदीत वेगवेगळ्या ठिकाणी सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. यातील अनेक जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. तर चामटोलीजवळ बुडून मृत्यू झालेलेल तरूण निर्जन ठिकाणी गेले होते. त्यामुळे येथील पाण्याचा अनेकांना अंदाज नव्हता. तर उल्हासनगर शहराकडे दोघांचा मृत्यू झाला.
या घटनांना काही दिवस उलटत नाही तोच शनिवारी उल्हास नदीत बुडून आणखी दोघांचा मृत्यू झाला. मुंबईतून पर्यटनासाठी आलेल्या या दोघांचा आपटी बंधाऱ्याजवळ बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली. उल्हास नदीचे धोकादायक भाग, सखोल भाग आणि ज्या ठिकाणी अपघात होऊ शकतात अशा ठिकाणांची माहिती पर्यटकांना व्हावी, यासाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अंबरनाथचे तहसिलदार अमित पुरी यांनी या ठिकाणी माहिती देणे, दवंडी देणे, स्थानिक तरूणांना बचावासाठी सज्ज ठेवणे अशा गोष्टींची पूर्तता करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. स्थानिक अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांनाही याकामी सहकार्य करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वार येथेही पावसाळ्यात कुंडात बुडून अपघात होत असतात. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पर्यटन बंदी केली जाते.