ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होणाऱ्या बारवी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या ११ दिवसात समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या ११ दिवसात धरणात तब्बल १३.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बारवीचा पाणीसाठा थेट ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १ जुलै रोजी बारवी धरणात १०६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते. तर ११ जुलै रोजी धरणात १५२ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आहे. त्यामुळे पाऊस असाच पडल्यास याच महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने यंदा गेल्या दहा वर्षातल्या दुसऱ्या निचांकी पावसाची नोंद झाली. त्याचा थेट परिणाम जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांवर झालेला दिसून आला. बारवी धरणात जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी पातळी थेट ३० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यामुळे पावसाची मोठी प्रतिक्षा होती. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरूवात झाली. १ जुलै रोजी बारवी धरणात अवघे १०६.६४ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा होता. मात्र जुलै महिन्यात गेल्या अकरा दिवसात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
बारवी धरण पूर्ण भरल्याशिवाय पाण्याचे व्यवस्थापन अशक्य –
बारवी धरण्यात ११ जुलै रोजी १५२.८५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा नोंदवला गेला आहे. बारवी धरणाच्या एकूण क्षमतेच्या हा साठा ४५.११ टक्के इतका आहे. धरणाची पाणी पातळी ६३.८८ मीटरवर आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा समाधानकारक असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे. मात्र बारवी धरण पूर्ण भरल्याशिवाय पाण्याचे व्यवस्थापन अशक्य आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात अशाच प्रकारे पाऊस पडल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकेल.