बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप नगरसेवकाने केलेल्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्पावर लाखो रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या वतीने ८७ लाख रुपये खर्च करून सुमारे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. उभारणीनंतर दुरुस्तीच्या कामासाठी व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली या प्रकल्पावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही आतापर्यंत या प्रकल्पातून एक युनिटही वीज निर्मिती झालेली नसल्याचा आरोप करत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात विविध प्रकारचे प्रकल्प वादात सापडले. यात वडवली स्मशानभूमीमध्ये सुरू करण्यात आलेला बायोगॅस निर्मिती प्रकल्प असाच वारंवार चर्चेत आला. वर्ष २०१३ मध्ये सुमारे ८७ लाख रुपये खर्च करून पालिकेने या बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली. शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन बायोगॅसची निर्मिती करून या स्मशानभूमीसाठी विद्युत व्यवस्था व्हावी या उद्देशाने या अभिनव आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. मात्र आजतागायत या प्रकल्पातून एक युनिट देखील वीज निर्मिती झाली नाही, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे. त्यातही सन २०१८ मध्ये बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली केवळ काही भाग बदलून ३७ लक्ष रुपयांचे बिल काढण्यात आले. ही लुट पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संमतीने करण्यात आल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला आहे. या दुरुस्तीनंतरही या बायोगॅस प्रकल्पातून एक युनिटही वीज निर्माण झाली नाही. तसेच या प्रकल्पाच्या पाच वर्षाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राटही काढण्यात आले. त्याचवेळी हे कंत्राट त्याच कंत्राटदाराला कसे मिळेल याचीही तजवीज करण्यात आलो. पहिल्या वर्षी १५ लाख, दुसऱ्या वर्षी १६.५० लाख, तिसऱ्या वर्षी १८.१५ लाख, चौथ्या वर्षी १९.१६ लाख, पाचव्या वर्षी २१.९६ लाख असा ९१.५७ लाख रुपयांचे हे कंत्राट होते.
सद्यस्थितीत या प्रकल्पाची प्रचंड दुरावस्था झाली असून पालिका या प्रकल्पाला कचरा देत नाही. तरीही कंत्राटदार पलिकेची लाखो रुपयांची लुट करत असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे केली आहे. प्रतिक्रिया: बायोगॅस प्रकल्पाच्या संबंधात लोकप्रतिनिधींनी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. लवकरच त्यावर भूमिका स्पष्ट केली जाईल. – मारुती गायकवाड मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.