तुम्हाला आता सांगून खरे वाटणार नाही, पण छान, सुंदर, मोकळी हवा, आल्हाददायक वातावरण, २४ तास- बारा महिने अगदी हवे तेवढे पाणी यासाठी आमच्या बदलापूरची पंचक्रोशीमध्ये ख्याती होती. तुम्हाला मी ही काही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट सांगत नाही. अगदी अलीकडच्या काळातही म्हणजे २५ वर्षांपूर्वीही आमचं बदलापूर अगदी असंच एखाद्या निसर्गचित्रासारखं लोभसवाणं होतं. गाव छोटं आणि माणसं गरीब होती, पण निसर्ग सौंदर्याची श्रीमंती अफाट होती. ‘बदल हा सृष्टीचा नियमच आहे. काळानुरूप तो होणारच. बदलापूर त्याला कसे अपवाद असेल?’ हे तुमचे सारे युक्तिवाद बरोबरच आहेत. आम्हालाही ते मान्य आहेत. खरे तर उगाचच भूतकाळाचे दाखले देऊन कोरडे उसासे टाकायला आम्हालाही आवडत नाही. मात्र बदलापूरमध्ये काळाचे चक्र जरा वेगाने फिरले असे बाकी आम्हाला वाटते. जरा विचार करा. एखाद्या दिवशी अचानकपणे आपल्या घरी चार माणसे पाहुणे म्हणून आली, तर आपला किती गोंधळ उडतो? त्यांची सरबराई, ऊठबस करताना आपली धावपळ होतेच ना. इथे बदलापूरमध्ये दरवर्षी साधारणपणे किमान दोन ते अडीच हजार कुटुंबे नव्याने राहायला येत आहेत, तीही कायमची. गेली दहा वर्षे हे असेच सुरू आहे. पुन्हा ही आहे फक्त अधिकृतपणे घर घेतलेल्या कुटुंबांची संख्या. चाळीत, झोपडपट्टीत येणारे वेगळेच. मुंबई, ठाणेच काय आता कल्याण-डोंबिवलीकरही बदलापूरकर होण्यात धन्यता मानू लागले आहेत. दरवर्षी गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसऱ्याला बदलापुरांच्या संख्येत लक्षणीयरीत्या वाढ होतेय. हं, आता ‘चौथी मुंबई’ म्हणून जेव्हा बदलापूरचा गौरव करतात, तेव्हा क्षणभर गालावरून मोरपीस फिरविल्यासारखे वाटते. मात्र दुसऱ्याच क्षणी वास्तवानुभवाने भानावरही यायला होते. कारण चौथी मुंबई राहिली दूर, उलट महानगरांमधून येणाऱ्या या लोंढय़ांमुळे आपल्या गावाची नालासोपारा किंवा विरारसारखी अवस्था तर होणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे.
परवा बऱ्याच वर्षांनी आलेला एक मित्र ‘आता बदलापूर किती बदललंय’ असे म्हणाला. बदललंय कसले, बिघडलंय असे त्याला सांगावं असं वाटलं, पण गप्प राहिलो. म्हटलं आपणच आपल्या गावाबद्दल, सॉरी शहराबद्दल वाईट कशाला बोला? मात्र वर्तमान परिस्थितीच इतकी बिकट आहे, की भूतकाळातील तो रम्य काळ आठवल्याशिवाय राहत नाही. कारण आता सगळाच घोळ झालाय हो. एकच उदाहरण देतो. आम्ही कुळगांवकर. रेल्वे स्थानकापासून आमचे घर अवघ्या पाच मिनिटांवर. त्यामुळे संध्याकाळी सातला आमची गाडी स्टेशनमध्ये शिरली, की घरी आमची सौभाग्यवती चहा टाकायची. आता तो जमाना गेला. कारण स्थानकात आलो तरी गर्दीचे चक्रव्यूह भेदून बाहेर रस्त्यावर यायलाच आता दहा-पंधरा मिनिटं लागतात. त्यात पाठोपाठ दुसरी गाडी आली की विचारूच नका. बारा महिने धो धो पाणी ही बदलापूरची ओळख. मात्र गेल्या वर्षी भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ मोर्चा काढावा लागला बदलापूरकरांना. अरे काय हे? सर्वाना किफायतशीर दरात घरं देणाऱ्या बदलापूर पालिकेला अद्याप स्वत:चे घर नाही. गेली वीस र्वष लोकप्रतिनिधी भाडय़ाच्या जागेतून स्थानिक प्रशासनाचा गाडा हाकताहेत. शहराचे भवितव्य बदलायचे सोडून राजकीय वैमनस्यातून एकमेकांचा बदला घेताहेत? आठ-दहा दिवसांवर पालिकेच्या निवडणुका आल्याने राजकीय पटलावरचे हे ‘बदलापूर बॉईज’ सध्या अगदी चेवात आहेत. भर चौकात एकमेकांची उणीदुणी काढताहेत. गावाचे (सॉरी शहराचे) ‘बदला’पूर नाव सार्थकी लावताहेत.
महादेव श्रीस्थानककर
तिरका डोळा : ‘बदला’पूर
तु म्हाला आता सांगून खरे वाटणार नाही, पण छान, सुंदर, मोकळी हवा, आल्हाददायक वातावरण, २४ तास- बारा महिने अगदी हवे तेवढे पाणी यासाठी आमच्या बदलापूरची पंचक्रोशीमध्ये ख्याती होती.
First published on: 11-04-2015 at 12:24 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur boys