Badlapur Case Eknath Shinde Statement Sanjay Raut Reacts : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच याप्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर व शाळेवर कारवाई करण्याची मागणी बदलापूरकरांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की “चार महिन्यांपूर्वी राज्यात अशीच एक बलात्काराची घटना घडली. मात्र आम्ही त्याप्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून दोन महिन्यात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली”. मात्र शिंदे यांचा हा दावा खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधक म्हणत होते की या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण योजना हवी. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की तीन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात माझ्या एका बहिणीबरोबर अशीच एक घटना घडली. आम्ही तो खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला. पीडितेची बाजू मांडण्यासाठी विशेष वकील व पुरावे दिले, पोलिसांनी भक्कम खटला उभा केला, खूप मेहनत केली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली”.
यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन बदलापूर प्रकरणानंतर केलेल्या एका वक्तव्याची व्हिडीओ क्लिप वायरल होत आहे. त्यात ते सांगत आहेत की दोन चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली, पण आम्ही ते प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं. दोन महिन्यांपूर्वी त्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे यांचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे”.
“शिंदेंनी भलत्याच माणसाला फासावर लटकवलं असावं”
संजय राऊत म्हणाले, “माझा एकनाथ शिंदेंना प्रश्न आहे की नेमकं हे प्रकरण कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं होतं ते त्यांनी जाहीर करावं. कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालवण्यात आला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली? कोणत्या कारागृहात संबंधित आरोपीला फाशी देण्यात आली? याबाबतचा तपशील शिंदेंनी जाहीर करावा. तसेच तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवलं आहे का ते सांगा. तुम्ही कुठल्या भलत्याच माणसाला फासावर लटकवलं आहे का ते स्पष्ट करावं”.
शिंदे काय म्हणाले?
हे ही वाचा >> Suresh Gopi : “…अन् अमित शाहांनी हातातले कागद फेकून दिले”, भाजपाच्या मंत्र्याने सांगितला तो प्रसंग
वर्षा बंगल्याच्या मागे फाशीची शिक्षा दिली का? संजय राऊतांचा प्रश्न
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी फाशीची जागा देखील सांगावी. त्यांनी वर्षा बंगल्याच्या मागे किंवा राजभवनाच्या मागे कोणाला फाशी दिली आहे का? ते स्पष्ट करावं. एखाद्या राज्यात कोणत्याही गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राजभवनात त्याबाबतची नोंद करावी लागते. राज्यपालांनी आदेश काढावा लागतो. त्यामुळे त्याची नोंद देखील जाहीर करावी. यासह माझं राज्यपालांना आवाहन आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य गंभीर आहे. त्याची त्यांनी दखल घ्यावी. या सरकारने परस्पर कोणाला फाशी दिली आहे का याची चौकशी करावी. तसेच तुमच्याकडे याबाबतची काही नोंद असेल तर ती महाराष्ट्रसमोर जाहीर करावी”.