बदलापुरात राजकीय मोर्चेबांधणी जोरात

अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिकेसाठी अंबरनाथपेक्षाही आता बदलापूर शहरातून विरोध वाढत असून यासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. बदलापूरची हद्दवाढ करावी आणि या शहराची स्वतंत्र महापालिका करावी, असा आग्रह भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही धरला आहे. या एकत्रित महापालिकेत अंबरनाथचा समावेश नसावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दबाव वाढविला जात असल्याचे वृत्त आहे. येत्या ५ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या कोकण आयुक्तांच्या बैठकीआधी बदलापूर नगरपालिकेत फक्त महापालिकेच्या विषयावर विशेष सभा घेण्यात यावी यासाठीच्या हालचालींना वेग आला असून भाजपच्या वीस नगरसेवकांनी सह्य़ांचे पत्र नगराध्यक्षांना सादर केले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनाही या सभेसाठी आग्रही आहे.

अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही नगरपालिकांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र महापालिका करण्याच्या हालचालींना कमालीचा जोर आला आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देत बदलापूर शहराच्या हद्दवाढीसह स्वतंत्र बदलापूर महापालिका करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चार दिवसांची शहरातील विविध भागांत स्वतंत्र महापालिकेसाठीची स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात प्रभाव असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महापालिकेच्या विरोधात शड्डू ठोकल्याचे चित्र दिसून येत आहे. अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महापालिकेला बदलापुरातील राजकीय व्यवस्थेने जोरदार विरोध सुरू केला आहे. बदलापूर शहराच्या हद्दवाढीसह स्वतंत्र महापालिका करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या एकत्रित महापालिकेसाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या अभ्यास समितीची पहिली बैठक येत्या ५ जानेवारीला होणार आहे. मात्र या बैठकीबद्दल कोणतीही माहिती पालिकेतील सदस्यांना न दिल्याबद्दल नगरसेवकांनी मुख्याधिकारी देवीदास पवार यांच्यावर शरसंधान केले होते. त्यामुळे ५ जानेवारीच्या सभेत सदस्यांच्या भावना मुख्याधिकाऱ्यांनी मांडावी यासाठी या बैठकीआधी या विषयावरच विशेष सभा घेण्याचे ठरविले जात आहे.

Story img Loader