डॉ. शकुंतला चुरी यांची पालिकेचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून निवड
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी आणखी एक पाऊल उचलले असून यासाठी त्यांनी शहरातली प्रथितयश महिला व बालरोगतज्ज्ञ व रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला चुरी यांची शहराच्या स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. त्यामुळे इथून पुढील शहर स्वच्छता अभियानांमध्ये त्या प्रमुख प्रचारक व मार्गदर्शक राहणार आहेत.
बदलापूर पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १२ नुसार स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेचा स्वच्छता दूत घोषित करण्याचा विषय होता. यावर बदलापूरमधील प्रथितयश डॉक्टर शकुंतला यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावाला सर्वानी एकमताने संमती दिली. त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. डॉ. चुरी या रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या विद्यमान अध्यक्षा असून त्या शहरात गेली ४३ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीने शहर स्वच्छतेसाठी चांगला चेहरा निवडला गेल्याची भावना या वेळी अन्य सदस्यांनी व्यक्त केली.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रभागवार स्वच्छता समित्या नेमण्याचा विषय चर्चिला गेला होता. प्रत्येक प्रभागातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रभागातील स्वच्छता समित्यांवरील सदस्यांची नावे यादीसह देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पालिकेकडे अद्याप कोणत्याही प्रभागातून अशा याद्या प्राप्त न झाल्याचे समजते आहे. याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता लवकरच या याद्या जमा करून त्या-त्या समिती सदस्यांकडे स्वच्छतेचा आढावा घेणार आहोत, असे स्पष्ट करण्यात आले.

सदस्य अधिकाऱ्यांविरोधातही आक्रमक
स्वच्छतेबाबतचा आणि हागणदारीमुक्त बदलापूरचा विषय आल्याने या विषयात नगरसेवकांनी चांगलाच सहभाग घेतला. या वेळी सेना-भाजपच्या सदस्यांनी नुकत्याच झालेल्या नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संपूर्ण शहर स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. मात्र, ते स्वच्छता करत असताना त्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जंतुनाशके उपलब्ध करून न दिल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली. तर सेना-भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेचे अधिकारी व विभागप्रमुख उद्धटपणे वागत असल्याचा मुद्दा काढत त्यांना तंबी द्या, अन्यथा सभात्याग करू, असा इशारा देत कारवाईची मागणी केली.

Story img Loader