कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील साफसफाई तसेच घरोघरी जाऊन घंटागाडीमार्फत कचरा संकलित करण्याच्या कामासाठी नव्याने कृती आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व प्रभागांचे मिळून ९ झोन तयार करण्यात येणार असून त्यासाठी सर्व मालमत्ता तसेच लोकसंख्या यांचे सर्वेक्षण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून विशेष सभेत देण्यात आली आहे. नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी देखील सफाईला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी किंवा अमृत सिटीमध्ये बदलापूरचा समावेश करावयाचा झाल्यास शहराच्या पुढीला वाटचालीचा तसेच भविष्यातले शहर कसे असेल याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा लागणार आहे. त्यामुळे सध्या शहरात पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सेवा सुधारण्यावर पालिकेला भर द्यावा लागणार आहे. म्हणूनच नव्याने अस्तित्वात आलेल्या ४७ प्रभागांच्या या पालिकेत सफाईचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखडय़ानुसार पालिका शहराचे लोकसंख्येप्रमाणे ९ झोन तयार करणार असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच यासाठी पालिका त्यांचे बंद पडलेले बायोमास, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर, खत प्रकल्प यांसारखे प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहे. यावेळी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व नाल्यांची नियमित सफाई होणे आवश्यक असल्याचे सांगून रस्त्यावर कचरा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना इमारतीच्या सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित केला आहे की नाही यासंदर्भात आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला सक्तीचा करावा अशी मागणीही त्यांनी केली. तर, नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी मोठी निवासी संकुले, मांस-मासळी विक्रेते, रुग्णालये आदींना कचऱ्यासाठी  पिशव्यांचा वापर बंधनकारक करण्याची मागणी सभे दरम्यान केली आहे. एकंदरीतच, पालिकेने व पालिकेतील सदस्यांनी स्मार्ट सिटी वा अमृत सिटी आदी प्रकल्पांमध्ये प्रवेश करण्यासाठी चंग बांधल्याचे दिसून येत असून यासाठी सर्व प्रथम त्यांनी स्वच्छता या विषयावर काम करण्याचे निश्चित केले आहे.

Story img Loader